राष्ट्रवादीच्या राजेशिर्केंचा धक्कादायक पराभव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

चिपळूण - येथील पंचायत समिती आणि तालुक्‍यातील जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांची बहीण सौ. युगंधरा राजेशिर्के यांचा धक्कादायक पराभव झाला. 

चिपळूण - येथील पंचायत समिती आणि तालुक्‍यातील जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांची बहीण सौ. युगंधरा राजेशिर्के यांचा धक्कादायक पराभव झाला. 

तालुक्‍यातील सावर्डे हा एकमेव गट खुल्या वर्गासाठी आरक्षित होता. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत यांची उमेदवारी राष्ट्रवादीने सावर्डे गटातून जाहीर केली. ऐनवेळी विक्रांत जाधव यांनी माघार घेतल्यानंतर शेखर निकम यांची बहीण सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी सावर्डे गटातून निवडणूक लढवली. भास्कर जाधवांचे भाऊ बाळशेठ जाधव यांनी आरक्षण जाहीर झाल्यापासून सावर्डे गटात शिवसेनेतर्फे मोर्चेबांधणी केली होती. त्या तुलनेत सौ. राजेशिर्के यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. पोफळी पंचायत समिती गटावर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची मक्तेदारी होती. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मयूर खेतले यांची पत्नी सौ. मीरा खेतले पोफळी गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. शिवसेनेच्या सौ. सुचिता सुवार यांनी त्यांचा पराभव करून राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढली. 

टेरव गणातून दीपाली पवार यांच्या रूपाने सेनेचा उमेदवार प्रथमच विजयी झाला; मात्र सेनेचे तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांचा पोफळी गणात पराभव झाला. राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळकृष्ण साळवी यांचे सुपुत्र विश्‍वनाथ साळवी यांनी त्यांचा पराभव केला. खेर्डी पंचायत समिती गणात सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह अपक्ष प्रशांत यादव असे तीन मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. ठसाळे आणि यादव खेर्डीचे माजी सरपंच, तर अनिल दाभोळकर माजी पंचायत समिती सदस्य होते. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नितीन ठसाळे काठावर विजयी झाले. खेर्डी जिल्हा परिषदेची जागाही शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. अलोरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार रमेश राणे यांचा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी पराभव केला. त्याशिवाय अलोरे आणि खडपोली या दोन्ही पंचायत समिती गणांवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले. चिवेली गणाची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपसभापती नंदकिशोर शिर्के पुन्हा विजयी झाले.

Web Title: ncp rajeshirke