रायगडमध्ये राष्ट्रवादीच राहणार एक नंबर : तटकरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

पवार साहेबांबरोबर काम करणारे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षापासून फारकत घेतली आणि त्यांनी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला.

नागोठणे : रायगड जिल्ह्यात कितीही उलाढाली घडल्या व उलथापालथी झाल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात यापूर्वीही एक नंबर होता, आजही एक आहे आणि भविष्यातही एक नंबरच राहील, असा प्रबळ आत्मविश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रदेश सरचिटणीस दत्ताजी मसुरकर यांची निवड झाल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज (रविवार) सुतारवाडी येथील कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठीकीत जाहीर केले. त्यावेळी ते बोलत होते.

- बारामती जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा : चंद्रकांत पाटील

यावेळी जिल्हा कार्याध्यक्षपदी मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीसपदी विजयराव मोरे, रोहा तालुकाध्यक्षपदी विनोदभाऊ पाशिलकर, पेण विधानसभा मतदार संघ कार्याध्यक्षपदी शिवरामभाऊ  शिंदे आदींचीही निवड झाल्याचे खासदार तटकरे यांनी जाहीर केले. 

यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, आमदार सुरेशभाऊ लाड, आमदार अनिकेतभाई तटकरे, अली कौचली, दत्ताजी म्हसुरकर, विजय खुळे, गीता पारलेचा, भास्कर विचारे, इकबाल शेख, महमद मेमन, मधुकर पाटील, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, नरेंद्र जैन, भाई टके, शिवाराम शिंदे, नंदू म्हात्रे, नरेश पाटील, लक्ष्मण महाले, उदय जवके, अंकित साखरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी तटकरे यांच्यावर असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते प्रेम करतात हे दिसून आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत तटकरे यांनी, तर आभार प्रदर्शन विजय खुळे यांनी केले.

- संभाव्य पुरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 347 कुटुंबांचे स्थलांतर

खासदार तटकरे म्हणाले की, संपूर्ण भारतात मोदी लाट असतानाही एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून मला चांगले यश संपादन करता आले. हे सर्व तुम्ही कार्यकर्ते, हितचिंतक सर्वसामान्य मतदार यांच्या मुले घडू शकले, याचा मला अभिमान आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांबरोबर काम करणारे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षापासून फारकत घेतली आणि त्यांनी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माझ्याबाबत देखील अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला गेला.

Image may contain: 7 people, people smiling, people standing and wedding

एक खासदार म्हणून माझ्या मतदार संघातील वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी मी चंद्रकांत पाटील यांची केवळ विकास कामांसंदर्भात भेट घेतली. तसेच मी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतल्याची अफवा पसरविण्यात आली. परंतु त्यावेळी मी माझ्या पत्नी समवेत दिल्लीत होतो. मी पक्षाच्या प्रमुख पदावर काम करत असल्यामुळे या सर्व अफवांना पूर्ण विराम दिला. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा का दिला? हे त्यांनाच माहिती आहे. तसेच श्रीवर्धनचे आमदार पक्षाला सोडून गेले असले तरी श्रीवर्धनची जनता आपलीच आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आपण या निवडणुकीत पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत. आपले व आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दत्ताजी म्हसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोराने तयारीला लागा, असे आवाहन शेवटी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दत्ताजी म्हसुरकर यांनी सांगितले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी आपले व मित्रपक्षाचे उमेदवार निवडून आणून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP was number one in the district and will remain number one says MP Sunil Tatkare