लोकसभेआडून राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी

मुझफ्फर खान
गुरुवार, 7 मार्च 2019

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, लोकसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी, तर राष्ट्रवादी आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भाजपचा भर आहे. 

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, लोकसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी, तर राष्ट्रवादी आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भाजपचा भर आहे. 

आघाडीच्या जागा वाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहील, ही शक्‍यता लक्षात घेत काँग्रेस नेत्यांकडून प्रचाराला सुरवात होणे गरजेचे होते. मात्र, काँग्रेसचे कार्यकर्ते फार सक्रिय नाहीत. जिल्हाध्यक्ष रमेश कदम, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठीवर भर आहे. आमदार सदानंद चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी गावोगावी फिरून विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटन करीत आहेत.

आमदार, खासदार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. खासदार विनायक राऊत यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मतदारांकडून शब्द घेत आहेत. स्पर्धक उमेदवार अद्याप ठरला नसल्यामुळे आरोप, प्रत्यारोप सुरू झालेले नाहीत. राष्ट्रवादीने मात्र, लोकसभेआड विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन नुकतेच झाले. यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज मंडळींना चिपळुणात आणून शेखर निकमांनी आपले वजन सिद्ध केले. १ मार्चला त्यांनी पिंपळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. जिल्हा परिषद गटाच्या या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली. तालुक्‍यात वर्चस्व असलेल्या शिवसेनेला पोखरण्याचा पद्धतशीर प्रयत्न शेखर निकमांकडून सुरू आहे.  

शहरात संभ्रम 
शहरात पालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांचा महोत्सव घेण्यात आला. सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळावा, म्हणून क्रेडाईच्या मदतीने गृहशोध हा उपक्रम घेण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे निवडणुकीत शहराची भूमिका काय असेल, हे अस्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs preparations for the Legislative Assembly