रणरागिनींना कडक सॅल्यूट! NDRF च्या 13 महिलांचे कौतुकच

रणरागिनींना कडक सॅल्यूट! NDRF च्या 13 महिलांचे कौतुकच

रत्नागिरी : पूर असो वा भूकंप किंवा त्याहूनही संहारक आपत्तीत धावा केला जातो तो एनडीआरएफ (NDRF)(राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) या पथकाचा प्रामुख्याने पुराच्या काळात हे पथक आपल्याला वाचवणारच, अशी खात्री लोकांना असते. अशा या संकटविमोचक पथकात प्राणाची बाजी लावून पूर असो वा दरडी, कोणत्याही परिस्थितीत अडकलेल्यांची सुटका करणाऱ्यांमध्ये 12 महिलांचा चमूही काम करतो आहे. या पथकातून गेल्या वर्षभरात महिलांचा समावेश झाला आहे. निधडेपणाने काम करण्यात आणि कोणत्याही संकटात पुरुषांपेक्षा काकणभर सरस असल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. पोसरे येथे दरडीखाली अडकलेल्यांना सुटका करणाऱ्या पथकातील सहा महिलांनी लोकांना तोंडात बोट घालायला लावले. साऱ्यांनी त्याला सॅल्यूट केला.(ndrf-100-women-disaster-combatants-and-rescuers-khed-chiplun-ratnagiri-posare-landslide-case-akb84)

खेड तालुक्यातील पोसरे गावातील सात कुटुंबे दरडीखाली गाडली गेली. गाडलेले मृतदेह काढण्यापासून ते माती उचलण्यापर्यंतची सर्वच कामे पथकातील महिला करत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातून या महिला या पथकात आल्या आहेत. संकटात एनडीआरएफची बाधित लोकांची सुरक्षा, शोध आणि सुटका करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. आतापर्यंत या पथकात महिला नसत. केंद्र शासनाने वर्षापूर्वी एनडीआरएफमध्ये महिलांची भरती केली. कोकणसह कोल्हापुरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या बारा महिला प्रत्यक्ष काम करत आहेत. रायगडमधील तळीये, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोसरे आणि कोल्हापुरातील मिरगाव येथे त्या बेडरपणे काम करीत आहेत.

पोसरेत गेल्या चार दिवसात १६ मृतदेह शोधण्यात यश मिळवले. अजूनही एकाचा शोध सुरू आहे.जेसीबीद्वारे खोदाई केली जाते तेव्हा तेथे मृतदेह सापडला तर तो व्यवस्थितीरीत्या बाहेर काढणे, तो वाहून नेणे यासारखी कामे महिला करत आहेत. एनडीआरएफच्या महिला भाईशा तांबे पोसरेतील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व काम करत असल्याचे सांगतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दरड कोसळून घरांवर तीन ते चार फुटाची माती साचलेली, अधूनमधून पावसाच्या मार्‍यामुळे कामात अडथळा, ग्रामस्थांच्या सहकार्याने घरांचा अंदाज घेणे सोपे नव्हे, अशा प्रतिकूल परिस्थितीत या महिलांसह हे पथक काम करीत आहे, अशी माहिती महिला जवान भाईशा तांबे देत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महिलांचे काम सर्वदूर पोचले आहे.

पुणे चाकणची रणरागिणी पथकात

एनडीआरएफच्या प्रशिक्षणासाठी त्या बारा महिला गेल्या सहा महिन्यात विविध राज्यातून दाखल झाल्या होत्या. त्यात बिहार, केरळ, आसाम, सिक्कीम, उत्तरप्रदेशसह महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रातून पुणे, चाकण येथील भाईशा तांबे ही रणरागिणी प्रत्यक्ष फिल्डवर आहे.प्रथमोपचार, पूर परिस्थितीत मिळेल त्या साधनांचा वापर करून वाहून जाणार्‍यांना वाचवणे, इमारत कोसळल्यानंतर शोधमोहीम राबवणे, दरड कोसळल्यानंतरची परिस्थिती हाताळणे, न्युक्लिअर किंवा व्हायरस प्रसारात मदत करणे यांसारख्या गोष्टींचे १९ आठवड्यांचे प्रशिक्षण त्या महिलांना देण्यात येत आहे. प्रशिक्षण सुरू असतानाच कोकणात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या महिला प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये सहभागी झाल्याचे एनडीआरएफच्या पथकांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com