पारंपरिक भात बियाणे संवर्धन का गरजेचे आहे ?

एकनाथ पवार
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

1995-96 पर्यंत सऱ्हास कोकणात पांरपांरीक भातबियाणे वापरली जात होती. यामध्ये सोफळा, वालय, बेळा, मुक्‍धा, राजहंस, मुणगा, यासारख्या अनेक भातबियाण्यांच्या समावेश होता. या पारंपारीक भातबियाण्यांमध्ये एक समान वैशिष्टय होते.

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - संकरित आणि सुधारीत भात बियाण्यांच्या सुकाळामध्ये सकस आणि पौष्टीक मानली जाणारी पारंपरिक भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या या बियाण्यांच्या तांदळला बाजारपेठेत मागणी वाढत असून त्याला चांगला दरही देण्यास ग्राहक तयार आहेत; मात्र आवश्‍यक पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पांरपरिक बियाणे संवर्धनाकरीता विद्यापीठ स्तरावर सीडबॅंक निर्माण होण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

कोकणात पांरपांरीक बियाण्यांचा  वापर
1995-96 पर्यंत सऱ्हास कोकणात पांरपांरीक भातबियाणे वापरली जात होती. यामध्ये सोफळा, वालय, बेळा, मुक्‍धा, राजहंस, मुणगा, यासारख्या अनेक भातबियाण्यांच्या समावेश होता. या पारंपारीक भातबियाण्यांमध्ये एक समान वैशिष्टय होते. एखाद्या बियाण्यांचा अपवाद वगळला तर या सर्व जाती कमी कालावधीच्या आणि अधिक उंचीच्या असत.

यासाठी शेतकरी वळले संकरित बियाण्यांकडे

खोड नाजुक आणि भाताला लोंबी आल्यानतंर ती जमीनीच्या दिशेने लोंबकळत राहत असायची. त्यामुळे एखादा जोराचा पाऊस झाला किंवा वारा झाला तर सर्व भातपीक जमीनीवर कोसळणे, भात गळुन पडणे असे प्रकार होवुन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक असायची. त्याचा परिणाम उत्पन्नावर व्हायचा त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न आणि अधिक मजबुत असलेल्या संकरित आणि सुधारीत बियाण्यांवर भर देण्यात सुरूवात केली.

भातपीकामध्ये क्रांतीकारक बदल

गेल्या काही वर्षात भातपीकामध्ये क्रांतीकारक बदल झाले. एक काडी, तीन काडी लावणींचे अनेक बियाणी बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली. कमी खर्च, कमी श्रम, आणि अधिक उत्पादन अशी बियाणी आल्यामुळे त्यांचा परिणाम पांरपारिक भात बियाण्यांवर झाला. तुलनात्मक स्पर्धेत ही पारंपारीक भातबियाणी मागे पडली. भरघोस उत्पन्नांच्या ओघात चव, सकसपणा, आणि आरोग्यांसाठी उपयुक्त असलेली पांरपारींक बियाणे दुर्लक्षित होवु लागली. या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी आजही पारंपारीक बियाण्यांची जागा संकरित किवा सुधारीत बियाणे घेवु शकलेली नाहीत.

काही प्रमाणात पारंपारिक बियाण्यांची लागवड

पांरपारींक भातबियाण्यांचा चवदारपणा आजही नव्या बियाण्यांमध्ये दिसुन येत नाही हे वास्तव आहे. वृध्द, लहान बाळ किवा रूग्णांसाठी आज देखील जुन्या बियाण्यांची पेज उपयुक्त ठरते. त्यामुळे काही शेतकरी अजुनही थोड्याफार प्रमाणात या बियाण्यांची शेती करीत आहेत.

पारंपारिक भात बियाण्यांना मागणी

पारंपारीक भात बियाण्यांचा तांदुळ सध्या बाजारपेठेत 80 ते 100 रूपये प्रति किलो दराने विकला जातो. परंतु तरीदेखील हा तांदुळ अनेकांना उपलब्ध होताना दिसत नाही. या तांदुळाला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि त्याला चांगला दरही देण्यास ग्राहक तयार आहेत.परंतु त्याचा पुरवठाच होत नसल्याचे चित्र सध्या बाजारपेठांमध्ये आहे

विद्यापीठस्तरावर सीडबॅंक गरजेची

पारंपरिक भातबियाणे ही पौष्टीक आणि चवदार आहेत. निरोगी आरोग्यासाठी या बियाण्यांचे संवर्धन आवश्‍यक आहे. या बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी विद्यापीठस्तरावर सीडबॅंक निर्माण होणे आवश्‍यक आहे. 
- विवेकानंद नाईक, कृषी सहाय्यक, वैभववाडी 

तांदळाची पेज खुप उपयोगी

पारंपरिक बियाण्यांपासून उत्पन्न कमी येत असले तरी लहान मुलांना किवा वृद्धांना या बियाण्यांच्या तांदळाची पेज खुप उपयोगी ठरते. त्यामुळे दरवर्षी थोड्याफार प्रमाणात या बियाण्यांची पेरणी करतो. 
- संतोष कडु, भातउत्पादक शेतकरी, आर्चिणे 

पारंपरिक भातबियाणे दृष्टीक्षेपात 
* सोफळा, वालय, बेळा, मुग्धा, राजहंस, मुगडा 
* फायदे - सकस, पौष्टीक, चवदार, लहान, वृध्द आणि रूग्णांसाठी उपयुक्त, 
* तोटा- उत्पन्न कमी, खोड नाजुक, भातपिकांचे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक, कमी कालावधींची पिके 
 
संकरित व सुधारीत भातबियाणे 
* फायदे - कमी खर्च, कमी श्रम आणि अधिक उत्पन्न, उंची कमी, अधिक कालावधीची बियाणी उपलब्ध, एक काडी, तीन काडी बियाण्यांमुळे लावणीचे काम सोपे, लोंब्या उभ्या येणे, खोड मजबुत आणि पीक कोसळण्याची शक्‍यता कमी. 
* तोटा - रासायनिक खताशिवाय उत्पादन अशक्‍य, त्यामुळे आरोग्यास हानीकारक, चवदारपणा, पौष्टीकतेची उणीव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Of Conservation Of Traditional Rice Seeds