आंब्याला हमीभावाची गरज ः  सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषि पदवीधर संघ "स्नेह सिंधु' यांच्यावतीने तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालयात आंबा बागायतदार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन श्री. सावंत यांच्या हस्ते झाले.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - आंब्याला हमीभाव मिळाला पाहिजे. आंबा विक्री व्यवस्थेतील पारंपारिक साखळी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी आंबा व काजू पिकाच्या उत्पादक कंपन्या झाल्यास बागायतदारांना सोयीचे होईल. यातून भविष्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असा विश्‍वास जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तळेबाजार येथे व्यक्‍त केला. 

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषि पदवीधर संघ "स्नेह सिंधु' यांच्यावतीने तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालयात आंबा बागायतदार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बॅंक संचालक ऍड. अविनाश माणगावकर, बॅंक संचालक प्रमोद धुरी, वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, धनंजय गोलम, संभाजी साटम, भाई आचरेकर आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, ""आंबा उत्पादक मेळावा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. आंबा बागायतदार शेतकरी सक्षम झाला पाहिजे. आंबा उत्पादन खर्च वाढत आहे. यासाठी आंबा पीक संरक्षण होऊन चांगले उत्पादन हाती आले पाहिजे. तसेच उत्पादित आंब्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. यासाठी आंबा उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना लाभदायक ठरू शकतील. आंबा बागायतदारांच्या हितासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी आंबा उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देतील. यामध्ये जिल्हा बॅंक शेतकऱ्यांसाठी सहकार्याची भुमिका बजावतील.'' 

यावेळी श्री. मुंज म्हणाले, ""पूर्वी फवारणीचे प्रमाण आतापेक्षा कमी होते. फवारणीचा सतत मारा करीत राहिल्यास किटक त्याला दाद देत नाहीत असे चित्र आहे. त्यामुळे किटकनाशकांचा अती वापर हानीकारक ठरू शकतो. यासाठी एकात्मिक कीडरोग नियंत्रण आवश्‍यक आहे. कोवळी पालवी, कोवळा मोहोर किडींचे खाद्य असते. यासाठी उंच झाडांवर औषध फवारणी सुक्ष्म आणि तुषार पध्दतीने झाली पाहिजे. रासायनिक खतांचा अती वापर टाळून सेंद्रीय खतावर भर दिला पाहिजे.'' 
आंबा उत्पादक कंपन्याच्या निर्मितीबाबत श्री. गोलम यांनी सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन मयुर सावंत यांनी केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Of MSP To Mango Satish Sawant Demand