अखेरच्या दिवशी नेटवर्कचा घाला

अमित गवळे
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पाली - बॅंकांमध्ये पाचशे-हजारच्या जुन्या नोटा जमा करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३०) सुधागड तालुक्‍यात नेमके बीएसएनएलचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे काही ठिकाणी बॅंकांचे कामकाज अतिशय संथपणे; तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले. अखेरच्या दिवशी नोटाबदलीसाठी आलेल्यांच्या जीवाची पुरती घालमेल पाहायला मिळाली. 

पाली - बॅंकांमध्ये पाचशे-हजारच्या जुन्या नोटा जमा करण्याच्या मुदतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३०) सुधागड तालुक्‍यात नेमके बीएसएनएलचे नेटवर्क बंद होते. त्यामुळे काही ठिकाणी बॅंकांचे कामकाज अतिशय संथपणे; तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाले. अखेरच्या दिवशी नोटाबदलीसाठी आलेल्यांच्या जीवाची पुरती घालमेल पाहायला मिळाली. 
जुन्या नोटा जमा करण्यासाठी अखेरच्या दिवशी बॅंकेत मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना हा पैसे काढण्याचा शेवटचा दिवस असल्याचेही वाटले. त्यांनीही बॅंकांमध्ये धाव घेतली. सकाळपासूनच तालुक्‍यात बीएसएनएलची सेवा बंद असल्याने ग्राहकांना तासन्‌ तास थांबावे लागले. 

पालीतील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत बीएसएनएलची सेवा खंडित झाल्यावरही ‘व्हिसॅट’ या नेटवर्कवर संथ गतीने काम सुरू होते. त्यामुळे कामकाजाला दुपटीहून जास्त वेळ लागत होता. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत इंटरनेटअभावी सर्व व्यवहार ठप्प होते. काही ग्राहक सकाळपासूनच इंटरनेट सुरळीत होण्याची वाट पाहत थांबले होते. अनेक जण कंटाळून निघून गेले. बाहेरगावाहून आलेले ग्राहक व आदिवासी मात्र बॅंकेबाहेर तिष्ठत बसले होते. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्यांची तर पुरती भंबेरी उडाली होती. 

पालीतील बीएसएनएल कार्यालयात विचारणा केली असता, ‘‘नागोठणे-पाली या मेन लाईनमध्ये बिघाड झाला आहे. दुपारनंतर नेटवर्क सुरू होईल’, असे सांगण्यात आले. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ४९ दिवस नेटवर्क चांगले होते; परंतु अखेरच्या दिवशी ते गुल झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

इतके दिवस सर्व सुरळीत होते. एका दिवसासाठी उगाच खोळंबा झाला, अशी प्रतिक्रिया बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

बॅंक ऑफ इंडियाच्या पाली शाखेचे व्यवस्थापक विश्वास नेरूरकर यांनी दुपारी सांगितले की, बीएसएनएलचे नेटवर्क गेले आहे. व्हिसॅटवर काम सुरू आहे. त्यामुळे ते संथ गतीने होत आहे.  बॅंकेत कर्मचारीही अपुरे आहेत; परंतु ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नेटवर्क केव्हाही आले तरी आलेल्या ग्राहकांना उशिरापर्यंत आम्ही पूर्ण सेवा व मदत देऊ. गुरुवारीही दीड-दोन तास नेटवर्क नसल्याने ग्राहकांची खूप गैरसोय झाली. आलेल्या ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत सेवा दिली. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत इंटरनेट पूर्णपणे ठप्प होते. नेटवर्क आल्यानंतर सर्व ग्राहकांना आम्ही सेवा पुरवू. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेऊ, पूर्ण सहकार्य करू, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ग्राहक मात्र हवालदील झाले होते. 

कामानिमित्त बॅंकेत नेहमी जाता येत नाही. पत्नीने साठवून ठेवलेल्या दोन-तीन पाचशेच्या नोटा तिला अचानक सापडल्या. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने त्या बॅंकेत जमा करण्यासाठी आलो; परंतु नेटवर्क संथ गतीने सुरू असल्याने मोठी पंचाईत झाली. दोन तास रांगेत उभे राहून अखेर नोटा बदलून मिळाल्या. 
- संतोष भोईर, शिक्षक, पाली

Web Title: network problem last day