esakal | 'त्या' २२ जणांना सामुहिक आरती पडली चांगलीच महागात 
sakal

बोलून बातमी शोधा

new 94 corona patient in ratnagiri

जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

'त्या' २२ जणांना सामुहिक आरती पडली चांगलीच महागात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  सामूहिक आरती आपली प्रथा आहे असे म्हणत सामूहिक आरती करणे चांगलेच महागात पडले आहे. आतरतीसाठी सहभागी असलेल्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावखडीत सामूहिक आरतीसाठी गेलेल्या २२ जणांवर क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे. 

कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र गणेश आगमन मिरवणुका, विसर्जन मिरवणुका यासह सामुहिक आरती करण्यावर बंदी घालण्यात आली होती. सोशल डिन्स्टींगचे पालन व्हावे यासाठी सामूहिक आरतीवर बंदी घातली होती. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी त्याचे उल्लंघन करण्यात आले. 

गावागावात सामूहिक आरती करण्याची प्रथा परंपरा आहे. मात्र कोरोनाचे सावट अधिक गडद झाले असताना सामूहिक आरती करु नये असे आदेश होते. परंतु, सामूहिक आरती आपली प्रथा परंपरा आहे, असे म्हणत गावखडी परिसरात सामूहिक आरतीचा कार्यक़्रम पार पडला. ज्या घरात सामूहिक आरती झाली होती, त्याच घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला त्रास होऊ लागला आणि आरती झाल्याच्या दुसर्‍या दिवशी पती-पत्नी रुग्णालयात दाखल झाले. यातील त्या जेष्ठ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गावात एकच घबराट पसरली. त्या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले होते, त्याची माहिती आरोग्य विभागाने घेतली. त्यवेळी माझ्या घरात सामूहिक आरती झाली. या आरतीसाठी गावातील २२ तरुण सहभागी झाले होते अशी माहिती दिल्याने आरोग्य विभागातील कर्मचारीदेखील चांगलेच हादरले. त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरी आरतीसाठी गेलेल्या तरुणांची यादी तयार करण्यात आली आणि त्यांचा शोध घेतला. त्या सार्वंना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र एकाच वेळी २२ जण होम क्वारंटाईन झाले, त्यातील काही तरुण नोकरी व्यवसाय करीत असल्याने त्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाचे आदेश असतानाा देखील हे आदेश धुडकावून सामूहिक आरती करणे या तरुणा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.

नव्या ९४ रूग्णांची भर
दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसर्‍या रविवारी कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही; मात्र कोरोनाचे नवीन 94 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यात आरटीपीसीआर चाचणीत 44 तर अ‍ॅण्टीजेन चाचणीमध्ये 50 रुग्ण सापडले आहेत. एकुण पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पावणेचार हजार इतका झाला आहे. मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे.

जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी कोरोना बाधितांचा शोध घेण्यावर भर देण्यात आला आहे. एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे या गोष्टींकडे गांभिर्याने पाहीले जात आहे. आरटीपीसीआर चाचणीबरोबरच अ‍ॅण्टीजेन तपासणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या आरटीपीसीआर केंद्रात दिवसभरात 44 नवीन बाधित आढळले आहेत. त्यात रत्नागिरी 13, दापोली 2, गुहागर 2, चिपळूण 3, संगमेश्‍वर 17, राजापूर 2 आणि लांजा 5 रुग्ण आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी जिल्ह्यात विविध केंद्र आहेत. त्यात 50 नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये दापोली 10, खेड 11, गुहागर 9, चिपळूण 8, रत्नागिरी 10, लांजा 2 रुग्ण आहेत. या चाचणीमध्ये 130 जणांची नमुने निगेटीव्ह आले आहेत.


रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी होत असला तरी दररोज पॉझिटिव्ह रुग्ण सापडतच आहेत. शनिवारी रात्री तालुक्यात 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कारवांचीवाडी परिसरातील पाच रुग्णांचा समावेश आहे. नाचणे परिसरात 3 रुग्ण सापडले असून गावखडी, चर्मालय, झारणी रोड, साखरपा, शेटे नगर, देवरुख, नेवरे, कुवारबाव, मिरजोळे आणि जयगड मधील एका कंपनीतील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे.

हे पण वाचा -  दार उघड उद्धवा, दार उघड! भाजपचे घंटानाद आंदोलन, वाचा सविस्तर... 

गेल्या आठ दिवसात याच खासगी कंपनीतील ठेकेदारी तत्त्वावर काम करणार्‍यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. त्यात प्रमुख अधिकार्‍यांचाही समावेश आहे. बाधित रुग्णांबरोबरच बरे होणार्‍यांचेही प्रमाण चांगले आहे. रविवारी दिवसभरात 23 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालय 5, कामथे 3, कळंबणी 1, संगमेश्वर 3, समाजकल्याण 5, घरडा हॉस्पीटल 5, रत्नागिरी पोलीस हेड क्वाटर्समधील 1 रुग्णाचा समावेश आहे.
 मागील रविवारी, सोमवारी जिल्ह्यात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा मृत पावणार्‍या रुग्णांची संख्या वाढू लागली. आठवडाभरानंतर पुन्हा रविवारी एकाही कोरोना बाधिताची नोंद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण मृतांचा आकडा 134 आहे.

हे पण वाचालोकमान्य टिळक जन्मभूमी ही रत्नागिरीकरांची जबाबदारी

संपादन - घनाजी सुर्वे 
 

loading image