शास्त्री नदीवर ८० वर्षांनंतर नवीन पूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दृष्टिक्षेप... 
 संगमेश्‍वरमधील सातपैकी तीन कामे सुरू
 चार पुलांची कामे पावसाळ्यानंतर
 सोनवी पुलाबाबत संभ्रम कायम

देवरूख - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. संगमेश्वरजवळील अपघातप्रवण क्षेत्रातील ३६ कि.मी. लांबीच्या धोकादायक क्षेत्रात लहान-मोठ्या ७ पुलांपैकी ३ पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. 

उर्वरित चार पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली आहे. शास्त्री नदीवरील नव्या पुलाचे काम तब्बल ८० वर्षांनंतर हाती घेण्यात आले असून ते ५० टक्के पूर्ण झाले आहे. 

आरवली ते बावनदी या ३६ कि.मी. लांबीच्या अतिअपघातप्रवण क्षेत्रातील शास्त्री आणि सोनवी हे दोन्ही पूल ब्रिटिश काळात १९३७ साली उभारण्यात आले. गेल्या ८० वर्षांत महामार्गावरील वाढलेली वाहन संख्या तसेच माल वाहून नेण्याची क्षमता पाहता शास्त्री आणि सोनवी हे दोन्ही पूल कमजोर ठरत आहेत. हंगामात या दोन्ही पुलांवर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. चौपदरीकरणात शास्त्री पुलावरील कामाचे दीड वर्षांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. दीड वर्षात नदीमधील १२ पिलर्सचे आणि त्यावरील गर्डर्सचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 

आरवली येथील गडनदीवरील पुलाचे, सप्तलिंगी नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू असून संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाच्या उभारणीबाबत अद्याप कोणतीही हालचाल नसल्याने संगमेश्वरवासियांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 

सोनवी नदीवरील हा पूलही ८० वर्षांपूर्वीचा आहे. माभळे आणि संगमेश्वर या दोन गावांना जोडणारा हा महत्वपूर्ण पूल आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी सप्तलिंगी येथे पुलाच्या कामाचे भूमिपूजन करून करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात दीड वर्षांनंतर या पुलाचे काम सुरू झाले. लांबीला छोटा असूनही या पुलाची उभारणी अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. 

 

Web Title: new bridge after 80 years on the river Shastri