नवे चर्च तीन वर्षांत उभारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सावंतवाडी - जुन्या चर्चच्या ठिकाणी नव्याने चर्च उभारण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून ख्रिस्ती बांधवांची समिती स्थापन करून याबाबतची अंतिम रूपरेषा जाहीर करण्यात येणार आहे, असा दावा तालुक्‍यातील ख्रिस्ती बांधवांतर्फे आज येथे पत्रकार परिषदेत केला. जुने चर्च संस्थानकालीन आहे, हे मान्य आहे; परंतु ती इमारत धोकादायक झाल्याने तसेच धर्मीयांची संख्या वाढल्याने जुनी इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. यात कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नाहीत, असेही या वेळी सांगण्यात आले.

शहरात साडेतीनशे वर्षांपासून उभे असलेले चर्च काल (ता. ४) अचानक पाडले. यामागे नेमके काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी संबंधित ख्रिस्ती बांधवांनी चर्चच्या बाजूलाच बैठक घेऊन काही निर्णय घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली. या वेळी बॅनी डिसोझा, मायकल फर्नांडिस, जेसीला सिक्वेरा, झिमीन फर्नांडिस, ग्रेसी डान्टस, रॉबर्ट अल्मेडा, सेबेस्तिन रॉड्रिक्‍स, ॲलेक्‍स डिसोझा, विल्यम सालढाणा, आवेलिन फर्नांडिस, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होत्या.

या वेळी चर्चबाबत उपस्थित बांधवांकडून आपली भूमिका मांडण्यात आली. ती अशी - संबंधित चर्च हे संस्थानकालीन आहे हे मान्य आहे; परंतु ते अतिशय जीर्ण झाले होते; तसेच हे चर्च हे जिल्ह्यातील एकमेव जुने चर्च आहे. यामुळे त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या धर्मीयांची संख्या जास्त आहे. यामुळे जुन्या चर्चमध्ये ही संख्या पुरणारी नाही. त्याचबरोबर भिंती जीर्ण झाल्यामुळे बाजूला असलेल्या शाळेच्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे एकंदरीत सर्व विषयांबाबत चर्चा केल्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन हे चर्च पाडण्याचा निर्णय घेतला. यात फक्त एका व्यक्तीचा विरोध वगळता अन्य लोक नवे चर्च उभारण्यासाठी सकारात्मक आहेत, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, येत्या तीन वर्षांत नवे चर्च उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक असलेला आराखडा तयार केला आहे. पालिकेकडून परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर चर्चचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुन्या आणि संस्थानकालीन चर्चचा मनोरा तसाच ठेवला आहे. तो योग्य आहे की नाही याबाबत बांधकाम विभागातील तज्ज्ञ आणून खात्री करण्यात येणार आहे. योग्य असेल तर तो ठेवण्यात येणार आहे. अन्यथा दुसरा विचार करण्यात येणार आहे. त्यांनी पुढे सांगितले, की हा सर्व निर्णय समाजातील लोकांनी एकत्र येऊन घेतला आहे. कोणीही लादलेला नाही. सद्यःस्थितीत प्रार्थना सुरू असलेले चर्च हे मिलाग्रीस हायस्कूलचा प्रार्थना हॉल आहे. त्यामुळे हे चर्च बांधण्यात आल्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व विधी व धार्मिक कार्यक्रम नव्या चर्चमध्येच करण्यात येणार आहे.

धर्मगुरूंचा हस्तक्षेप नाही
लोकांना विश्‍वासात घेऊन या चर्चचे काम सुरू करण्यात येणार आहे. यात त्यासाठी लवकरच एक पॅरिश समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यात काही ठराविक बांधवांची नेमणूक करून निर्णय घेण्यात येणार आहेत. या प्रकियेत धर्मगुरूंचा कोणताही हस्तक्षेप नाही आणि यापुढे राहणार नाही, असे या वेळी उपस्थितांकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: new church in three years