Photo : कोकणातील जागतिकस्तरीय ‘पिंदा कोंकणेसीस’ च्या दुसर्‍या प्रजातीचा लागला शोध....कोठे वाचा...

राजेंद्र बाईत
Monday, 20 July 2020

अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्‍चंद्र गड परिसरामध्ये ‘पिंदा श्रीरंगी गोसावी व चांदोरे’ या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे.

राजापूर (रत्नागिरी)  : जैवविविधततेने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये विविध दुर्मिळ आणि प्रदेशानिष्ट अशा मोठ्याप्रमाणात वनस्पती आढळतात. त्यामध्ये आता जागतिकस्तरीय नव्या फुलवनस्पतीची भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्‍चंद्र गड परिसरामध्ये ‘पिंदा श्रीरंगी गोसावी व चांदोरे’ या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती कोशंबीर कुळातील असून ह्या वनस्पतीचा गण ‘पिंदा’ हा उत्तर सह्याद्री डोंगररांगेत प्रदेशानिष्ठ आहे. ‘पिंदा’ ह्या गणात याअगोदर फक्त ‘पिंदा कोंकणेसीस’ ही एकच प्रजाती होती. मात्र, ह्या नव्या संशोधनामुळे आता दुसर्‍या प्रजातीची नोंद झाली आहे.

‘पिंदा श्रीरंगी गोसावी व चांदोरे’  फुलवनस्पती

गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. पी. टी. आर्टस व आर. वाय. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी निलेश माधव, रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरूण चांदोरे, त्यांचा संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे यांच्या दोन वर्षाच्या संशोधनानंतर या नव्या फुल वनस्पतीचा शोध लागला आहे.  

 

वनस्पती शास्त्राचे  प्राध्यापक डॉ. एस आर यादव

हेही वाचा- रत्नागिरीत कोरोनाचा कहरच : आणखी ४० जणांना कोरोनाची बाधा... -

हरिश्‍चंद्र गड व परिसरातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी फेरफटका मारीत असताना डॉ. गोसावी आणि सहकार्‍यांनी नाविण्यपूर्ण असणारी ही फुलवनस्पती त्यांच्या नजरेस पडली. तिच्याबद्दल कुतूहूल वाटल्याने त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली असता ही नवीन प्रजाती असल्याचे निदर्शनास आले. त्यातून, या वनस्पतीचे संशोधन आणि अभ्यास केला असता या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला. हरिश्‍चंद्र गड परिसरातील अहमदनगर आणि नशिक भागामध्ये या वनस्पतीचे संशोधन करण्यात आले.

 

हेही वाचा- पर्यटनाच्या उद्देशाने उभारला, पण लाटांच्या तडाख्यात सापडला

‘पिंदा श्रीरंगी’ या फुलवनस्पतीची संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर 17 जुलै, 2020 रोजी स्वीडन येथून प्रकाशित होणार्‍या नॉर्डीक जनरल ऑफ बॉटनी (पेीवळल र्क्षेीीपरश्र ेष लेींरपू) या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाच्या माध्यमातून नोंद झाली आहे. या संशोधनास नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाने मदत केली. या संशोधनास गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी.व आर.वाय.के. महाविद्यालय, नाशिकचे प्राचार्य डॉ. व्ही.एन. सुर्यवंशी, आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, डॉ. बी.आर.कांगुणे, डॉ. एन. एल. जाधव, प्रा. एस.जी.मेंगाळ आदींचे सहकार्य लाभले.

 

‘पिंदा श्रीरंगी’ची कोवळी पाने

“ नव्याने संशोधित झालेली फुलवनस्पती विशिष्ट उंचीवरच्या उभ्या कातळावर हरिश्‍चंद्र गड येथे सापडते. ती अतिशय दुर्मिळ असल्याने तिचे तातडीने संवर्धन होणे गरजेचे आहे.”

प्रा. डॉ. अरूण चांदोरे

 
 

‘पिंदा श्रीरंगी’ची  वैशिष्ट्ये

उभ्या कातळावर वाढते
1 ते 1.5 मीटर उंची
पाने 50 ते 90 सेंमी लांब
फउले पांढर्‍या रंगाचे लहान फुलोर्‍यातील कडेच्या फुलांच्या पाकळ्या मोठ्या
फुलोरे आकर्षक
पानाच्या देठावर आणि खोडावर गडद रंगाच्या रेषा

 

असे झाले नामकरण

राजापूर तालुक्यासह सह्याद्रीच्या पर्वतरांगातील नवनव्या वनस्पतींच्या झालेल्या संशोधनामध्ये प्रा. डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांचे महत्वपूर्ण योगदान राहीले आहे. त्याप्रमाणे ‘पिंदा श्रीरंगी’ या नव्या संशोधित वनस्पतींच्या संशोधनामध्ये डॉ. यादव यांचे योगदान राहीले आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून या फुलवनस्पतीला ‘श्रीरंगी’ हे नाव देण्यात आले आहे. या वनस्पतीचे वर्गीकरण आणि संवर्धन या विषयात त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new flowering plant called Pinda Srirangi Gosavi and Chandore has been discovered in Harishchandra Gad area of ​​Ahmednagar district