भूमिपूजन, उद्‌घाटनांसाठी नवा फंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनासाठी आमदार सदानंद चव्हाण यांनी वेगळा फंडा वापरलेला आहे. कार्यकर्त्यांची रॅली 10 आणि 11 डिसेंबरला काढून विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन केले जाणार आहे. यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन आणि निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली जाणार आहे.
जिल्हा नियोजन मंडळ, खासदार, आमदार आणि जिल्हा परिषदेच्या निधीतील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन करताना यापूर्वी जाहीर मेळावे आणि कार्यक्रम घेतले जात होते.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राजकीय वातावरण तापविण्यासाठी सर्वच पक्षांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यातून मतदारांना आकर्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन नियमानुसार एखाद्या कामाचे आदेश आचारसंहितेपूर्वी दिले गेले आहेत; मात्र कामाला सुरवात झाली नसेल, तर ते काम आचारसंहितेच्या कालावधीत करता येत नाही. त्यामुळे मंजूर कामांचे भूमिपूजन करून ते तातडीने ठेकेदारांकडून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन केले.

आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूण मतदारसंघात निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार ठरविण्यासाठी श्री. चव्हाण ग्रामीण भागात बैठका घेत आहेत. यानिमित्ताने गावात जाताना आमदार चव्हाण कार्यकर्त्यांना रॅलीची माहिती देत आहेत. एकाच भागात येणाऱ्या गावांमधील विकासकामांचे एकाच दिवशी भूमिपूजन करायचे. त्यासाठी आमदार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीने त्या गावात दाखल होतील. सत्कार, जाहीर भाषणे आणि आभार ही अनौपचारिकता न करता मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्‌घाटन करून तातडीने पुढच्या गावात रवाना होतील. अशा प्रकारे दोन दिवसांत तालुक्‍यातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनाचा जंबो कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

"जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता या महिन्यात केव्हाही लागू होण्याची शक्‍यता आहे. हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे माझ्याकडे वेळ कमी आहे. उपलब्ध वेळेचे नियोजन करून कमी वेळात जास्तीत जास्त विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न आहे.''
- सदानंद चव्हाण, आमदार, चिपळूण

दृष्टिक्षेपात
* आमदार सदानंद चव्हाणांचा फंडा
* पारंपरिक पद्धतीला फाटा
* राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न
* पालकमंत्र्यांकडून कार्यक्रम सुरूच

Web Title: new funda for election campaign