पोमेंडीत डोंगर पोखरून नवीन रेल्वे स्थानक

राजेश कळंबटे
सोमवार, 13 मार्च 2017

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी नवीन स्थानके निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात रत्नागिरी ते निवसर या पंधरा मिनिटांच्या मार्गात पोमेंडी येथे नवीन स्थानके उभारण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून सुरू झाले आहे. बोगदा आणि पूल यांच्यामध्ये हे स्थानक उभारावे लागणार आहे. त्यासाठी पुन्हा कोकण रेल्वेला डोंगर खोदावा लागणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण वेगाने सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर येथील काम सुरू करण्यात आले आहे. शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी जाईल. तोपर्यंत नवीन स्थानके निर्माण करून रेल्वे गाड्यांचे थांबे वाढविण्यावर भर दिला जात आहे. रत्नागिरी ते निवसर सुमारे 16 किलोमीटरचा मार्ग आहे. रत्नागिरी स्थानकातून सुटलेली गाडी निवसरला पोचण्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. हा मार्ग डोंगराळ भागातून जातो. तेथे टनेल आणि पूल सर्वाधिक आहेत. दुपदरीकरणही अशक्‍य आहे. रत्नागिरीतून गाडी निघाली तर निवसरमध्ये आलेली गाडी थांबवून ठेवावी लागते. त्यात पंधरा मिनिटांचा कालावधी वाया जातो. हा वेळ कमी करण्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाचा पर्याय सूचविण्यात आला. त्यासाठी पोमेंडी निश्‍चित करण्यात आले आहे.

पोमेंडीचा भाग एकेकाळी सर्वाधिक धोकादायक म्हणून प्रसिद्ध होता. डोंगर कापून रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेचे उपाय केले आहेत. डोंगरातील माती पावसाच्या पाण्याबरोबर रेल्वे रुळावर येत असल्याने वाहतूक ठप्प होत होती. आता ही चिंता कायमस्वरुपी मिटली आहे. येथे वारंवार धोका निर्माण होत असल्याने पर्यायी मार्गाचे सर्व्हेक्षण झाले होते. टनेलच्या बाजूने रुळ टाकण्याचा विचार त्यावेळी सुरू होता. नवीन रेल्वेस्थानक निर्माण करण्याच्या निर्णयाने त्याला पुन्हा चालना मिळाली आहे. स्थानकाच्या ठिकाणी गाडी उभी करण्यास आवश्‍यक रुळ उभारण्यासाठी जागेची गरज लागणार आहे. त्यासाठी डोंगर खोदाईचा एकमेव पर्याय रेल्वे प्रशासनापुढे आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्ण होईल, असा दुजोरा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला.

पोमेंडी तांत्रिक स्थानक आहे. वाहतूक वेगवान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. फिजिबिलीटी अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
- बाळासाहेब निकम, विभागीय व्यवस्थापक

Web Title: New Railway Station in Pomendi