नव्या कोऱ्या मोटारी आंबोलीतून लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

आंबोली : वाहतुकीदरम्यान नव्या कोऱ्या स्विफ्ट मोटारी चोरीला जाण्याचा प्रकार आज उघड झाला. कंटेनरमधील पाचपैकी एक मोटार आधीच चोरीला गेली असून दुसरी चोरण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आंबोली : वाहतुकीदरम्यान नव्या कोऱ्या स्विफ्ट मोटारी चोरीला जाण्याचा प्रकार आज उघड झाला. कंटेनरमधील पाचपैकी एक मोटार आधीच चोरीला गेली असून दुसरी चोरण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील नांगरतास गडदूवाडी येथे 1 डिसेंबरपासून एक कंटेनर उभा होता. त्याच्या बाजूला एक नवी स्विफ्ट मोटारही उभी होती. गाडी बंद पडली असावी, अशा शक्‍यतेने स्थानिकांनी याकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात या कंटेनरमधून मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट मोटारींची वाहतूक होत होती. कंटेनर अखिल खान (रा. मेवाद, हरियाना) चालवित होता; मात्र कंटेनर ठरलेल्या वेळेत पोचला नसल्याने मारुती कंपनीने जीपीआरएसच्या मदतीने शोध सुरू केला. या वेळी कंटेनर आंबोलीच्या जवळपास असल्याचे लोकेशन सापडले.

आंबोली कोल्हापूरपासून जवळ असल्याने तेथील कंपनीचे व्यवस्थापक जयभगवान दिलीप सिंग (रा. शिरोळ, कोल्हापूर) यांना स्थिती पाहण्यास सांगण्यात आले. श्री. सिंग आज आपल्या सहकाऱ्यांसमवेत आंबोलीच्या दिशेने येत होते. गवसे येथे आले असता एक टोईंग वाहन नवी कोरी स्विफ्ट मोटार ओढत आणत असल्याचे त्यांना दिसले. या गाडीच्या पुढे नंबरप्लेट नसलेल्या दोन मोटारसायकल होत्या. श्री. सिंग यांना संशय आल्याने त्यांनी टोईंगवाल्याला थांबविले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने समोर असलेल्या दुचाकीस्वारांकडे बोट दाखविले; मात्र तोपर्यंत दोघांनी तेथून पळ काढला. सिंग यांना संबंधित मोटार आपल्याच कंपनीची असल्याचे व तिची पुढची दोन चाके काढल्याचे लक्षात आले. ते ही मोटार व टोईंगचालकाला घेऊन आजरा पोलिस ठाण्यात गेले; मात्र हा गुन्हा आंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांना आंबोलीत पाठविण्यात आले.

आंबोलीत घटनास्थळी पोचले असता कंटेनरमधील एक मोटार आधीच चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. याबाबत संबंधित टोईंगवाल्याकडे विचारणा केली असता त्याला येथे बोलावणाऱ्यांना ओळखत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याच्या गाड्यांनाही नंबरप्लेट नव्हती. येथील पोलिसांनी पंचनामा केला. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून टोईंगवाल्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह एफ. बी. काळसेकर, गुरू तेली, जी. पी. देसाई, प्रशांत धुमाळे, इर्फान मुजावर करीत आहेत.

रॅकेटची शक्‍यता
हा कंटेनर एक डिसेंबरपासून आंबोलीत उभा होता. तेव्हापासून चालक खान पसार आहे. या दरम्यान एक गाडी चोरण्यात आली. आज आठवड्यानंतर दुसरी गाडी चोरीला जात होती. त्यामुळे या प्रकरणात चालकासह मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: new swift cars stolen