शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसविली नवीन तलवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

महाड : रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता नवीन तलवार बसविण्यात आली. दहा डिसेंबरला मेघडंबरीतील या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटले होते, त्याची दखल घेत ही नवीन तलवार बसविण्यात आली आहे. तसेच, मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

महाड : रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता नवीन तलवार बसविण्यात आली. दहा डिसेंबरला मेघडंबरीतील या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटले होते, त्याची दखल घेत ही नवीन तलवार बसविण्यात आली आहे. तसेच, मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे, कोकणचे आयुक्त प्रभाकर देशमुख, तहसीलदार औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत ही तलवार बसविण्यात आली.
रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याच्या तलवारीचे सहा ते सात इंचांचे टोक तुटल्याचे सुरक्षारक्षक संदीप अवकिरकर यांच्या निदर्शनास दहा डिसेंबरला आले. याबाबत पुरातत्त्व विभागाने पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे व आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी जाऊन शिवप्रेमींना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. सतीश घारगे या शिल्पकाराकडूनच ही तलवार बनवून घेण्यात आली आहे व ती पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बसविण्यात आली. रायगडावर होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच, राजदरबाराजवळ सुरक्षा व्यवस्था आणि विजेची सोय करण्यात आली असल्याचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

या घटनेनंतर प्रभाकर देशमुख यांनी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. रायगड किल्ल्यावर गडाचे संवर्धन व विकास करण्याबाबत केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. गडासाठी सद्यःस्थितीत 77 कोटी रुपये मंजूर झाले असून, सहाशे सहा कोटी रुपयांचा रायगड विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राजसदर ते होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर ते बाजारपेठ या ठिकाणी दगडी फुटपाथ, जगदीश्वर मंदिर व शिवसमाधी दुरुस्ती, शिलालेखाचे जतन, मेघडंबरी व राजसदर, अष्टप्रधान निवास, जिजाऊ समाधी या सर्वांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. निवासासाठी "एमटीडीसी'च्या निवास व्यवस्थेचीही दुरुस्ती केली जाणार आहे. तलावदुरुस्ती व पाणीपुरवठा अशी महत्त्वाची कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: new sword to chhatrapati shivaji maharaj statue