माथेरान राणी मिनीट्रेनसाठी नवीन इंजिनाचा साज

संतोष पेरणे
रविवार, 24 मार्च 2019

  • नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन
  • एनडीएम1 श्रेणी मधील 407 या क्रमांकाचे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहचलेले
  • मागील दोन वर्षातील सलग आठवे इंजिन
  • भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली

नेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन पोहोचले. एनडीएम1 श्रेणी मधील 407 या क्रमांकाचे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहचलेले एनडीएम1 श्रेणी मधील मागील दोन वर्षातील सलग आठवे इंजिन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली आहेत. दरम्यान,सर्व इंजिनांना एकसारखी रंगसंगती असावी यासाठी जुन्या इंजिनांना नव्या पर्यटन हंगामासाठी नव्याने सजविण्यात येत आहे.

 नेरळ-माथेरान-नेरळ या नॅरोगेज मार्गावर चालविल्या जाणाऱ्या मिनीट्रेनसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आता एनडीएम1 श्रेणीमधील पाचवे इंजिन बनवून घेतले आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचे असलेले हि नवीन इंजिने नेरळ लोको मध्ये मागील दोन वर्षात सहा महिन्याचे अंतराने येत आहेत. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या प्रवासात मागिल काही दशकात मोठे बदल झाले. त्यात वाफेवर चालणारे इंजिन नॅरोगेज ट्रकने प्रवास करताना आगीचे लोळ बाहेर पडून जंगलाचा मोठा ऱ्हास आगी लागून होत होता. त्यामुळे नंतरच्या काळात मिनीट्रेनची इंजिने डिझेलवर चालू लागली. मिनीट्रेनच्या ताफ्यात ब्रिटिश काळानंतर एनडीएम 500 आणि 550 या श्रेणीमधील काही इंजिने आली. त्यातील पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानी यांनी बनविलेली पहिली इंजिने म्हणून एनडीएम1 श्रेणीमधील 400 पासून सिरीयल सुरु होते ती इंजिने 2016 पासून येण्यास सुरु झाली. मात्र आजही एनडीएम 550 श्रेणीमधील इंजिने मिनीट्रेनच्या ताफ्यात आहेत. 

मुंबई कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत बनलेली एनडीएम1 या श्रेणीमधील 400, 401, 402, 403 या चार इंजिनानंतर 22 नोव्हेंबर 2018 ला पाचवे इंजिन एनडीएम1 404 हे इंजिन दाखल झाले होते. सहावे आणि सातवे इंजिन डिसेंबर 2018 मध्ये 405 आणि 406 या नामावलीत इंजिन नेरळ लोको मध्ये पोहचली आहेत. आता आठवे एनडीएएम1 407  हे आठवे इंजिन मार्च महिन्यात नेरळ ला पोहचले आहे. या सर्व इंजिनांची बांधणी भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी केली आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या भावी काळातील पर्यटन हंगामासाठी नवीन इंजिने हि सुचिन्हे समजली जात आहेत. तब्बल आठ नवीन इंजिने मिनीट्रेनच्या ताफ्यात आल्याने आगामी पर्यटन हंगामासाठी मध्य रेल्वे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, 2006 मध्ये नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या ताफ्यात आलेल्या दोन इंजिनांना नवा साज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनडीएम 551 हे इंजिन मिनीट्रेनच्या ताफ्यातील यशस्वी इंजिन असून त्या इंजिनांना नव्याने जांभळा आणि पिवळा रंग देऊन मिनीट्रेनच्या ताफ्यातील अन्य इंजिन एकसारखी करण्याचा प्रयत्न रेल्वेचा आहे. एनडीएम 551 या इंजिनाला नवीन रंगसंगती देऊन मुंबई कुर्ला येथील कार्यशाळेतून आज 23 मार्चला नेरळ येथे आणले गेले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newest engine for Matheran queen minitrain