वैभववाडी बसस्थानकाचा प्रश्‍न सुटेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

वैभववाडी बसस्थानकाच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात असताना नियोजीत जागेवरील अतिक्रमणामुळे त्याला पुन्हा स्पिडब्रेकर लागला आहे. जोपर्यत जागेवरील अतिक्रमण हटविले जात नाही तोपर्यत एसटी महामंडळ जागा ताब्यात घेणार नाही हे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासन हे अतिक्रमण हटवुन ही जागा एसटी महामंडळाच्या कधी ताब्यात देणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वैभववाडी - वैभववाडी बसस्थानकाच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात असताना नियोजीत जागेवरील अतिक्रमणामुळे त्याला पुन्हा स्पिडब्रेकर लागला आहे. जोपर्यत जागेवरील अतिक्रमण हटविले जात नाही तोपर्यत एसटी महामंडळ जागा ताब्यात घेणार नाही हे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासन हे अतिक्रमण हटवुन ही जागा एसटी महामंडळाच्या कधी ताब्यात देणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वैभववाडी तालुका निर्मीतीला तब्बल 35 वर्षे झाली. तालुका निर्मितीनंतर अनेकांनी बसस्थानकाकरीता सातत्याने प्रयत्न केले. परंतु जागेअभावी हे बसस्थानक होवु शकले नाही. माजी आमदार प्रमोद जठार यांनी 2008 मध्ये अल्पबचत भवन इमारत आणि त्यालगतची जागा वैभववाडी बसस्थानकाकरीता मिळावी अशी मागणी सुरूवातीला केली. त्यानतंर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ही जागा बसस्थानकासाठी योग्य असल्याचे मान्य केले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी हे बसस्थानक व्हावे याकरीता आपआपल्यापरीने प्रयत्न सुरू ठेवले. सुरूवातीला एसटी महामंडळाने महसुलने जागेची केलेली मुल्यांकनीय रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर ही जागा मोफत मिळविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू झाले. परंतु महिनाभरापुर्वी राज्य परिवहन महामंडळाने महसुलने मुल्यांकन केलेली रक्कम 38 लाख 50 हजार 256 रूपये भरण्याची तयारी दर्शविली. या रक्कमेचा धनादेश महामंडळाने महसुल विभागाकडे भरणा केला.

दोन-तीन दिवसापुर्वी महसुलचे अधिकारी नियोजीत जागेचा ताबा राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात देण्याकरीता जागेवर गेले आणि जागा मोजणीअंती त्यांना धक्का बसला. एसटी बसस्थानकाकरीता पैसे भरून घेतलेल्या 1285 चौरस मीटर जागेपैकी अंदाजे 225 चौरस मीटर जागेवर अतिक्रमण झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जागेचा ताबा घेण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दृष्टीक्षेपात आलेल्या वैभववाडी बसस्थानकाचा प्रश्‍नाला पुन्हा खीळ बसली आहे.

राज्य परिवहन महामंडळांचा कारभार सध्या बाजारपेठेतील एका निवारा शेडमध्ये सुरू आहे. जेमतेम तीस ते पस्तीस लोकच या शेडमध्ये बसु शकतील अशी या शेडची रचना आहे. त्यामुळे वैभववाडी बसस्थानक हा लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि गरजेचा विषय बनला आहे.अनेक वर्षानंतर हा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली होती; मात्र अतिक्रमणामुळे हा प्रश्‍न आता रखडण्याची शक्‍यता आहे.

अतिक्रमणामुळे महामंडळाने जागा ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर महसुल प्रशासनाने यासदंर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. जोपर्यत महसुल प्रशासन अतिक्रमण हटवुन 1285 चौरस मीटर जागा राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात देत नाही तोपर्यत महामंडळ जागा ताब्यात घेणार नाही आणि जोपर्यत महामंडळ जागा ताब्यात घेत नाही तोपर्यत बसस्थानकाची उभारणी होणार नाही. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने बसस्थानकाचा प्रश्‍न महसुल प्रशासनाच्या कोर्टात आहे. महसुल प्रशासन किती तत्परतेने निर्णय घेते त्यावरच बसस्थानकाचे भवितव्य अवलबुंन असणार आहे.

अतिक्रमणाला आशिर्वाद कोणाचा मिळतोय?
महसुलच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा अहवाल तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी 2015 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असल्याची माहिती आता पुढे येत आहे. अहवाल दिला असेल तर आतापर्यत अतिक्रमण का हटविले नाही असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाला काही अधिकाऱ्यांचेही पाठबळ आहे का हे तपासुन पाहावे अशी मागणी लोकांमधुन होत आहे.

''राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकाच्या जागेकरीता 38 लाख 50 हजार एवढी रक्कम महसुलकडे भरले आहेत.महामंडळाला 1285 चौरस मीटर जागा देणे आवश्‍यक आहे. त्यानुसार आम्ही तितकीच जागा महामंडळाच्या ताब्यात लवकरच देवु. या जागेसंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे.''
- संतोष जाधव, तहसिलदार, वैभववाडी

सर्व्हे नंबर 36 मधील अतिक्रमणाचीही चौकशी करा
बाजारपेठेतील सर्व्हे क्रमांक 36 हा शासकीय आहे. या सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. सर्व्हे क्रमांक 36 मध्ये झालेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकांमधुन होत आहे. या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यां शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सुध्दा होत आहे.

Web Title: News story about vaibhavwadi bus station