#MyNewspaperVendor पेपर विक्रेता ते पिंपरीचे उपमहापौर

 #MyNewspaperVendor पेपर विक्रेता ते पिंपरीचे उपमहापौर

कणकवली - घरोघरी वृत्तपत्र विकत राजकारणात प्रवेश करून राजकीय जीवन यशस्वी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे शरद ऊर्फ राजू मिसाळ यांनी उपमहापौर पदापर्यंत मजल मारली. सावंतवाडीत दहावीपर्यतचे शिक्षण घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी मिसाळ यांनी पिंपरी चिंचवड गाठले. तेथे आपल्या कष्टाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना मिळविलेले यश नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. 

कोकणातील तरुण रोजीरोटीसाठी शहराकडे धाव घेतात. अनेकजण मुंबईचा आसरा घेतात; मात्र शरद मिसाळ यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत सावंतवाडी वृत्तपत्र घरोघरी पोचविण्याचा व्यवसाय निवडला. त्यानंतर ते पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी शोधण्यासाठी गेले. तेथे नोकरी न करता त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय स्वीकारला. शहर वाढत गेले तसतसे मिसाळ यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय वाढत गेला. शहरी भागात तब्बल चार वर्षे घरोघरी वृत्तपत्र विकणारे शरद मिसाळ राजू या नावाने परिचित होत गेले.

वाचकांना सेवा पुरविताना प्रत्येक व्यक्तीशी जुळत गेलेले नाते त्यांना राजकारणाकडे ओढत नेले. त्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते शरद यांचे मित्र होते. सहाजिकच शरद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले राजकीय भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरूवातीच्या काळात पक्षाची विविध पदे त्यांना मिळत गेली. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग १५ मध्ये नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली. तेथे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या शरद यांनी उपमहापौर पदापर्यंत मजल मारली. तब्बल तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 

वृत्तपत्र विक्रेता हा खरा सेवक
वृत्तपत्र घरोघरी पोहोचविणे हे खडतर काम. वाचकांची भूक भागविण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता आपली प्रामाणिक सेवा बजावत असताना ऊन, वारा, पावसाची तमा बाळगत नाही. असाच हा वृत्तपत्र विक्रेता खरा समाजाचा सेवक असतो. समाजानेही अशा घटकाकडे आदराने पाहिले पाहिजे. आपली सुख-दुःखे बाजूला ठेवून रोज पहाटे वाचकाच्या घरात वृत्तपत्ररूपी ज्ञानगंगा पोचविणारा हा घटक समाजाचा एक आदर्श असतो, असे मत मिसाळ व्यक्त करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com