सिंधुदुर्गात रात्री संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

night Curfew konkan sindhudurg
night Curfew konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - पालकमंत्री उदय सामंत यांनी आठ दिवस रात्रीची ऐच्छिक संचारबंदी जाहीर केलेली असताना आज अचानक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत शासकीय संचारबंदी जाहीर केली. मास्क न वापरता फिरताना आढळून आल्यास दंड 300 वरून 500 रुपये केला आहे. संचारबंदी नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी नवीन आदेश काढताना जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये, असे स्पष्ट केले आहे. यामधून अत्यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट आहे. या वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्‍तींविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व सार्जजनिक ठिकाणी, आस्थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असेल. मास्क, रुमाल न वापरल्यास 500 रुपये दंड आहे, असे नमूद केले आहे. 

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आदेशात म्हटले आहे, की सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्‍तींकडून एक हजार रुपये दंडाची रक्‍कम महसूल, पोलिस व स्थानिक प्राधिकरण वसूल करतील. मास्कजवळ बाळगून त्याचा वापर न करणे किंवा योग्य रितीने वापर न करणे या बाबीही मास्कचा वापर न करणे, याप्रमाणे समजून दंड आकारणी होईल. लग्न समारंभ फक्त 50 व्यक्‍तींच्या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्‍यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा, यात्रा, जत्रा, उरुस आदींचे फक्त धार्मिक विधी फक्त 50 व्यक्‍तींच्या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. 

स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनेच बाजार 
जिल्ह्यातील आठवडा बाजार स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भरवता येणार नाहीत. पर्यटनस्थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्थळे, उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे आदी ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे. 

पथके बनवणार 
कोविड-19 बाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसाठी महसूल, पोलिस व संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांचे ठिकाणी भेटी देऊन तरतुदींचा भंग होत असल्यास दंडात्मक कारवाई करतील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेली फेस कव्हर, मास्क, हातमोजे यांची संबंधितांनी योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com