K-OK Nilesh Rane comment शिवसैनिकांचा हल्ला ठार मारण्यासाठीच - नीलेश राणे | eSakal

शिवसैनिकांचा हल्ला ठार मारण्यासाठीच - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

शिवसेनेचे काही लोक देसाईच्या घरात जाऊन धमक्‍या देत आहेत. ही तर सुरुवात आहे, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी - एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात दोनशे ते अडीचशे शिवसैनिकांनी अमित देसाई या आमच्या एका माणसाला ठार मारण्यासाठी हल्ला केला. पोलिसांनी तेव्हा बघ्याची भूमिका घेतली हे योग्य नाही. शिवसेनेचे काही लोक देसाईच्या घरात जाऊन धमक्‍या देत आहेत. ही तर सुरुवात आहे, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.

स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अमित देसाई आज उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना बघण्यासाठी नीलेश राणे रत्नागिरीत आले होते. या वेळी रुग्णालय परिसरातच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ‘‘शिवसैनिकांनी मिळून विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित देसाईवर हल्ला केला. किरण सामंत, बाबू म्हाप हातखंब्यातील काही लोक देसाईच्या घरी जाऊन त्याला धमक्‍या देत आहेत. देसाई दडपणाखाली असल्याने तक्रार दाखल केली नव्हती. आमदार उदय सामंत राष्ट्रवादीमध्ये असतानाची त्यांची भूमिका दाखवली. याचा राग येऊन किरण सामंत यांनी सर्वांना उसकावून देसाईला मारण्याचा कट रचला.

बावा चव्हाण, आमदार राजन साळवी, बारक्‍या हळदणकर, संजू साळवी, सर्व एकत्र येऊन देसाईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस यावेळी बघ्याची भूमिका घेतात हा कोणता न्याय. काल दुकान फुटले, ही तर सुरुवात आहे. संशयित आरोपी म्हणून निष्कलंक असलेल्या नित्यानंद दळवी, श्री. मसुरकर, देसाई यांची नावे टाकता. वेळप्रसंगी पोलिस ठाण्याच्या बाहेर बसू. पोलिसांना मान देतो, पोलिसांनी समान न्यायाने कारवाई करावी. आमचे आमदार देखील सभागृहात आहेत.’’ 

राणे-बोडके यांच्यातही खडाखडी
शहर पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांची नीलेश राणे यांनी भेट घेतली. तिथेही दोघांमध्ये खडाखडी झाली. पोलिस बघ्याची भूमिका घेतात. गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून गुन्हा दाखल करता काय? असे राणे यांनी विचारले. त्यावर ‘अमित देसाईला तक्रारीसाठी फोन केला होता. मात्र ते आले नाहीत. आम्हाला सर्वच सारखे’, असे श्री. बोडके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nilesh Rane comment