नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा - राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने थांबवला पाहिजे. प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेऊन त्यांना जाणूनबुजून डिवचण्याचे काम सरकारने थांबवावे, असा इशारा माजी खासदार स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने थांबवला पाहिजे. प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेऊन त्यांना जाणूनबुजून डिवचण्याचे काम सरकारने थांबवावे, असा इशारा माजी खासदार स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिला. तसेच शिवसेनेने दुटप्पी भूमिका थांबवून प्रकल्प रद्दसाठी प्रयत्न करा, अशी सूचना केली.

रत्नागिरीतील निवासस्थानी ते बोलत होते. ते म्हणाले, जनतेच्या भावनांची चेष्टा करण्याचे काम सरकार करीत आहे. नाणार परिसरातील स्थानिक जनता आधीच त्रस्त आहे. त्यांना रिफायनरी प्रकल्प नको आहे. तरीही सरकार जाणूनबुजून डिवचायचे काम करत आहे. ज्या सरकारमध्ये भागीदार शिवसेना आहे. स्थानिक आमदार त्यांचा आहे. असे असतानाही पाणी नेण्यासारख्या विषयांवर सह्या होतातच कशा, कोयनेचे पाणी मुंबईला न्यायचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर आता तो नाणार प्रकल्प नेण्याचा प्रयत्न झालाच. तो आम्ही होऊ देणार नाही. सरकारने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन हे सगळे प्रयत्न थांबवले पाहिजे. सरकारने लोकांना झुंजत ठेवायचे उद्योग थांबवावेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. ते त्यांनी पाळले पाहिजे. बॅनर फाडण्यापुरतेच काम शिवसेना करणार का, त्यापेक्षा शासनातील काम करा आणि प्रकल्प रद्द करून आणा. 

नेतेच कंत्राटदाराला छळताहेत
मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरीतील काम संथ गतीने होण्यासाठी स्थानिक नेतेच कारणीभूत आहेत. येथील आमदारांनी आपापल्या भागातील कामे वाटून घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. त्यामुळेच हे काम रखडले आहे. रायगड, सिंधुदुर्गमधील कामे वेगाने सुरू आहेत. नेतेच कंत्राटदाराला छळताहेत, या परिस्थितीत काम कसे करणार, असा प्रश्‍न राणेंनी उपस्थित केला.

Web Title: Nilesh Rane comment