त्यांनी आग लावली, आम्ही राख करू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

सावंतवाडी - ‘संजू परब यांची गाडी जळणे, ही दुर्घटना नसून हा पूर्वनियोजित कट आहे. यामागे शिवसेनेच्या लोकांचा हात आहे,’ असा आरोप माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सावंतवाडी - ‘संजू परब यांची गाडी जळणे, ही दुर्घटना नसून हा पूर्वनियोजित कट आहे. यामागे शिवसेनेच्या लोकांचा हात आहे,’ असा आरोप माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

‘तुम्ही आग लावली, आम्ही राख करू आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ. परब यांच्या पाठीशी पक्षाची फौज उभी केली जाईल,’ असे प्रतिपादनही राणे यांनी केले.

स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष परब यांची गाडी जाळल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. राणे आज येथे आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘परब यांच्या गाडीला लागलेली आग दुर्घटना नसून तो पूर्वनियोजित कट आहे. 

परब गेले अनेक दिवस लोकशाही मार्गाच्या माध्यमातून  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात जाऊन जनतेची कामे करत आहेत. त्याचा फटका केसरकरांना बसत आहे. त्यामुळेच हा थंड दहशतवाद सुरू आहे, जो त्यांच्या विरोधात जाईल, त्याला आपल्या गृहमंत्रिपदाचा गैरवापर करून त्रास देण्याचा कट रचला जातो. यापूर्वी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गाडीवरसुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.’’

ते म्हणाले, ‘‘परब यांनी पक्षाच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे येणारा लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका आपल्याला बसेल. त्यामुळे ही सर्व कटकारस्थाने शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहेत; मात्र काही झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही. परब यांच्यावर झालेला हल्ला माझ्यावर झालेला आहे. त्यामुळे याचे उत्तर त्याच ताकतीने देण्यात येईल.’’

बारा तासांत आरोपी पकडा!
पत्रकार परिषद झाल्यानंतर राणे यांनी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘या प्रकारामागे शिवसेनेच्या लोकांचा हात आहे. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर याला जबाबदार आहेत. त्यामुळे नेमका यामागे कोण, तो आरोपी येत्या बारा तासांत पकडा; अन्यथा उद्यापासून पोलिस ठाण्यावर तंबू ठोकून बसू,’ असा इशारा दिला. ‘माझ्यासाठी कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे निवडणूक असली तरी प्रचाराचे मला जास्त पडले नाही,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजू परब, विशाल परब, आनंद शिरवलकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane comment