बाळासाहेबांची तत्त्वे, निष्ठा धुळीस; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray konkan sindhudurg
Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याचे दिवस आता संपले हे विरोधकांनी ध्यानात घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे, निष्ठा धुळीस मिळविल्याने त्याचा राग जनतेने मतदानातून काढला आहे. सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने नाकारत चांगलेच तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे नेते, खासदार नीलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

येथील नीलरत्न निवासस्थानावर श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपला जे यश मिळाले त्याचे सर्व श्रेय त्यांनी तालुक्‍यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकत्यांना दिले. येथील जनतेने पुन्हा एकदा नारायण राणे, भाजपवर विश्‍वास ठेवताना तालुक्‍यात घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचीच सरशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राणे म्हणाले, ""शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार वैभव नाईकांना आमदारकी समजलीच नाही. आमदार म्हणून ते सपशेल अपयशी ठरल्याचे या निवडणूकीत दिसून आले तर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा गेम केला. गेल्या काही महिन्यात आम्हाला कोरोना दिसला; मात्र आमदार दीपक केसरकर कुठेच दिसले नाहीत. आमदार नाईक यांची 2024 ची शेवटची निवडणूक असेल. भाजपच त्यांचा पराभव करेल. खासदार विनायक राऊत यांनी साधी एक बालवाडी सुरू केली नाही. कोणाला रोजगार दिला नाही.'' 

...तरीही विमानतळ सुरू नाही 
गोव्यातील मोपा विमानतळाबाबत अनेक करार झाले आहेत. त्यामुळे चिपी विमानतळाबाबतचे करार होऊ शकलेले नाहीत. गोव्यात येणाऱ्या विमानांचे चिपी विमानतळ पार्कींग करायचे आहे का? अद्याप बऱ्याच परवानग्या प्रलंबित आहेत. या विमानतळाची दोनवेळा उद्‌घाटने झाली; मात्र विमानतळ सुरू झालेले नाही. या विमानतळाची वाट लावण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या विमानतळाबाबत जे काही करायचे आहे ते आमच्या कार्यकाळात करू असे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

हे तर पोर्तुगीज... 
गोव्यावर जसे पोर्तुगीजांनी गोड बोलून राज्य केले तसेच पालकमंत्री उदय सामंत हे गोड बोलून राज्य करत आहेत. त्यांच्या भावाने अधिकाऱ्यांना बिघडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांबाबत अशांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची कामे पालकमंत्र्यांच्या भावाने घेतली असून याला वेळीच हद्दपार करण्याची वेळ आली आहे. वाळू व्यावसायिकांना सोडण्यासाठी अधिकारी पैसे घेतात. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसून ते अधिकाऱ्यांना बिघडविण्याचे काम करत असल्याने त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा काय करणार? असेही श्री. राणे यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com