नीलेश राणेंच्या दिल्ली मार्गावर अनेक अडथळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

चिपळूण - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार नीलेश राणेंनी रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या दिल्ली मार्गावर अनेक अडथळे आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना पूर्वीच्या जखमांवर मलमपट्टीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

चिपळूण - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार नीलेश राणेंनी रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या दिल्ली मार्गावर अनेक अडथळे आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना पूर्वीच्या जखमांवर मलमपट्टीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

२०१४ ला देशभरात मोदी लाट होती. या लाटेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेने काँग्रेसकडून परत घेतला. खासदार विनायक राऊत विक्रमी मताने विजयी झाले. बदलत्या राजकीय प्रवाहात त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कंट्रोलही हातात घेतले. या काळात त्यांनी मतदारसंघात स्वतःचा गट बांधला. शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी यांच्यामध्ये विश्‍वास निर्माण केला. मतदारांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे खासदार राऊत यांची बाजू भक्कम मानली जाते. 

नीलेश राणेंनी मात्र सर्वांनाच अंगावर घेण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. काँग्रेसमध्ये असताना ते शिवसेनेवर टीका करायचे. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भाजपला पाठिंबा दिला. राज्यात शिवसेना-भाजप सत्तेवर असल्यामुळे राणेंची शिवसेनेवरील टीका काही प्रमाणात भाजपलाही टोचायची. आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये पुन्हा युतीबाबत बोलणी सुरू झाली आहे. युती झाली तर त्यात राणेंना स्थान मिळणार नाही, त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवणे किंवा अन्य कोणत्यातरी पक्षाचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढविण्याचा पर्याय राणेंसमोर आहे.

काँग्रेसकडून राणेंना पुन्हा उमेदवारी मिळणे शक्‍य नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन राणे लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणेंनी त्यांची भेट घेतली. राणेंची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्गमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे राणेंना राष्ट्रवादीची साथ मिळण्याची शक्‍यता आहे. 

अशोक चव्हाण, जाधवांची साथ मिळणे कठीण
लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील राणे विरोधी गट नीलेश राणेंचे काम करेल की नाही, याबाबतही शंका आहे. राष्ट्रवादीतील सुनील तटकरेंचा गट राणेंसाठी काम करेल ही राणेंसाठी जमेची बाजू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांची राणेंना साथ मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

Web Title: Nilesh Rane in Race of Loksabha Election