निर्व्हाळ उपकेंद्राला उद्‌घाटनाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

चिपळूण - तालुक्‍यातील खरवते प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत येणाऱ्या निर्व्हाळ आरोग्य उपकेंद्र इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या इमारतीचे अद्याप उद्‌घाटन झाले नाही. रुग्णांच्या सोयीसाठी तातडीने उपकेंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन करून ते सुरू करावे, अशी मागणी निर्व्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्‍यातील विविध गावांत प्रस्तावित असलेल्या उपकेंद्रांना निधी मिळत असला तरी इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही. परिणामी भाड्याच्या जागेतच उपकेंद्रांना आसरा घ्यावा लागत आहे. ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागांची उपलब्धता करावी, अशी सूचना आमदार सदानंद चव्हाण यांनी विकासकामांच्या आढावा बैठकीत केली होती. 

या सूचनेप्रमाणे निर्व्हाळवासीयांनी आरोग्य विभागाला जागा उपलब्ध करून दिली. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन गावांसाठी उपकेंद्र मंजूर झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ४ लाखांचा निधी प्राप्त झाला. 

स्वमालकीच्या जागेत निर्व्हाळ येथील उपकेंद्राच्या इमारतीचे कामही तीन महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास गेले; मात्र अद्यापही या ठिकाणी वैद्यकीय साहित्य उपलब्ध झालेले नाही. आमदारांच्या सूचनेप्रमाणे शासनाला सहकार्य करत निर्व्हाळ ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी सहकार्य केल्यानंतरही आरोग्य विभाग उपकेंद्र सुरू करण्यास विलंब लावत आहेत. 

खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या उपकेंद्राच्या इमारतीची पाहणी करून इमारत ताब्यात घ्यावी. वैद्यकीय साहित्य आणावे. पावसाळ्यापूर्वी उपकेंद्राचे उद्‌घाटन करून आरोग्य विभागाच्या सेवांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: nirval subcenter inauguration