Nisarg Storm Hit Sindhudurg Heavy Rains In Sawantawadi Taluka
Nisarg Storm Hit Sindhudurg Heavy Rains In Sawantawadi Taluka

निसर्ग चा तडाखा; सावंतवाडी तालुक्‍यात वादळी पाऊस

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - निसर्ग वादळाचा काहीसा परिणाम तालुक्‍यातही दिसुन आला. दोन दिवसापासुन तालुक्‍यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पावसासह सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. तालुक्‍यात आत्तापर्यंत 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्‍यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. त्यात कोकण किनारपट्टीला धडकणाऱ्या निसर्ग वादळाचा परिणामही दिसू लागला आहे. सोमवारी (ता.1) सकाळपासून सुरू झालेला पाऊस दोन दिवस संततधार कोसळत आहे. कोसळणाऱ्या पावसाबरोबरच सोसाट्याचा वाराही वाहत असल्याने काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये तळवणे गावात घरावर झाडे पडून मोठी नुकसानी झाली तर सोनुर्ली, निरवडे, माजगाव, आंबोली, माडखोल आदी भागात रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक खंडीत झाली होती. ग्रामस्थांसह बांधकामच्या कर्मचाऱ्यांनीही झाडे बाजूला करून वाहतूक सुरू केली.

माजगाव मेटवाडी येथे काल (ता.2) रात्री शिरोडा सावंतवाडी मार्गावर चिंचेचे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णतः खोळंबली होती. हे झाड ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. निरवडे रेल्वे स्टेशनची काही जीर्ण झालेले झाड रस्त्यावर कोसळले.

शहरामध्ये बाहेरचावाडा दत्तनगर येथे कालेलकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून घराच्या छपराचे नुकसान झाले. स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी तात्काळ नुकसानीची पाहणी केली. ग्रामस्थांनी हे झाड बाजूला केले. तर खासकीलवाडा येथे वीज वितरण कंपनीने नव्याने उभारलेला विद्युत खांब तुटून बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यावेळी गाडीच्या आतमध्ये बसलेले काजू व्यवसायिक परेश रेगे हे सुदैवाने बचावले. वीज वितरण कंपनीने केलेले हे काम बोगस असून खांब उभारण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचा असल्याचे आरोप येथील नागरिकांनी करत मोटारीच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

संततधार कोसळणाऱ्या पावसाने आजही आपली रिपरिप सुरूच ठेवली होती. त्यामुळे शेततळ्यात पाणी पाणी साचले होते. नदीच्या किनारी असलेल्या गावात काही ठिकाणी चढणीचे मासेही पकडण्याचा आनंद ग्रामस्थांनी लुटला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com