निसर्ग वादळामुळे वेंगुर्लेत पडझड 

Nisarg Storm Lash Vengurle SIndhudurg Marathi News
Nisarg Storm Lash Vengurle SIndhudurg Marathi News

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र लाटा आज सकाळपासून धडकत होत्या. तालुक्‍यात पडलेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे पडून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 1 ते 3 जून या कालावधीत 133.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याट्यामुळे तालुक्‍यात कालपासून (ता. 2) पावसाने जोरदार हजेरी लावली. आज समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठमोठ्या लाटाही किनाऱ्याला येऊन धडकत आहेत. सागरेश्‍वर किनारी धोक्‍याचा लाल बावटा लावला आहे.

मंगळवारच्या मध्यरात्री पाऊस आणि सोसाट्याचा वार गेल्याने तालुक्‍यात ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पडलेल्या झाडांच्या पालापाचोळ्याने रस्त्यावर कचरा दिसून येत होता. 

काल (ता. 2) रात्रीच्या सुमारास भेंडमळा येथील कमलाकर शांताराम नवार यांची केळीची झाडे वाऱ्याने पडून नुकसान झाले. याच दिवशी सायंकाळी 7.15 च्या सुमारास वेंगुर्ले बंदर नजिक पुष्कराज कोले यांच्या मालकीच्या सागरसरीता या हॉटेलचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले.

आज सकाळी मातोंड येथील नारायण मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून 15 हजारांचे नुकसान, वजराठ येथील गोपाळकृष्ण गावडे यांच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने 4 हजारांचे नुकसान, आरवली येथील सुरेश बापू शेरटे यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे 23 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आडेली येथील धोंडू धर्णे यांच्या घरावर झाड पडून 40 हजारांचे नुकसान झाले. पहाटे 4 वाजता दाभोली गावातील मांजरेकरवाडी व मोबारवाडी याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर मोठे झाड पडल्याने विद्युत ताराही तुटून पडल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com