आमदार नीतेश राणेंचे आरोप बालिशपणाचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

देवगड ः देवगड-जामसंडेला गोगटे-घाटे घराण्याचा शाप आहे, असे आमदार नीतेश राणे यांचे आरोप बालिशपणाचे आहेत. सवंग प्रसिद्धीसाठी येथील इतिहास न बघता मतांची पोळी भाजून घेण्यासाठी ते असले हास्यास्पद आरोप करत असल्याची प्रतिटीका माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी केली.

देवगड ः देवगड-जामसंडेला गोगटे-घाटे घराण्याचा शाप आहे, असे आमदार नीतेश राणे यांचे आरोप बालिशपणाचे आहेत. सवंग प्रसिद्धीसाठी येथील इतिहास न बघता मतांची पोळी भाजून घेण्यासाठी ते असले हास्यास्पद आरोप करत असल्याची प्रतिटीका माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी केली.

श्री. राणे यांनी गोगटे आणि घाटे घराण्यावर टीका केली होती. याला उत्तर देण्यासाठी युतीच्या प्रचार कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. गोगटे म्हणाले, ""आमच्या घराण्यात आजपर्यंत समाजकारणासाठी राजकारण केले. कधीही स्वार्थ बघितला नाही. सहकाराच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. उलट राणे यांनी स्वतःची मालमत्ता उभी करण्यासाठी राजकारणाचा उपयोग करून घेतला. गोगटे घराण्याने इथल्या हापूसला जागतिक दर्जा मिळण्यासाठी मोलाचे योगदान दिले. येथील सुज्ञ जनतेलाही ठाऊक आहे. माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या आमदारकीच्या काळात येथील वाडी-वस्त्यांवर रस्ते, वीज, पाणी पोहोचवून देवगड, जामसंडेचा शाश्‍वत विकास (कै.) बापूसाहेब गोगटे यांनी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यपदाच्या काळात केला. याचे ज्ञान आमदार राणे यांनी नारायण राणेंकडून घ्यावे. गोगटे, घाटेंवर टीका केली म्हणजे आपण निवडणूक जिंकू या भ्रमात राणेंनी राहू नये. मी आमदार असताना आणि नंतर प्रमोद जठारांनी केलेली विकासकामे येत्या शाश्‍वत विकासाचा पाया रोवणारी ठरली. या उलट नारायण राणे मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री असतानाही त्यांच्या मतदारसंघात अजूनही अनेक समस्या उभ्या आहेत. त्यांच्याकडे एवढी पदे असूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. आमचा इतिहास हा सुसंस्कृत आणि विकासाचा आहे. आमच्या घराण्यावर आजपर्यंत धमकी, गाड्यांच्या जाळपोळीसारखे आरोप नाहीत. गोगटे घराण्यातून कोणालाही संरक्षण घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही. येथे नेहमीच शांतता व सलोखा असतो. त्यामुळे सुसंस्कृत देवगडमध्ये शांततेलाच थारा असेल.
केंद्रात व राज्यात युतीची सत्ता आहे. नगरपंचायतीसाठी थेट राज्याकडून निधी येतो. त्यामुळे युतीकडे नगरपंचायत गेल्यास इथला आणखी विकास होणार आहे. युतीचे नेते यासाठी कटिबद्ध आहेत.''

Web Title: nitesh' accusations are kidding