शिवसेनेकडून तरुण, पालकांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

नाणार प्रकल्प रद्द केल्याचे श्रेय स्थानिक जनतेला 
शिवसेनेस सत्तेत राहून जैतापूरसारखा प्रकल्प रद्द करता आलेला नाही. तेव्हाही जनतेने दबाव टाकला. आता नाणार प्रकल्प रद्दची अधिसूचना काढली आहे. त्याबाबतही विश्वास नाही. जोपर्यंत गॅझेटमध्ये जाहीर प्रसिद्धी होत नाही, भूसंपादनासाठीच्या जागा घेतल्या त्या सात-बारावर एमआयडीसीचा शेरा काढला जात नाही, तोपर्यंत हा प्रकल्प कसा रद्द होईल, मुळात मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करायला हवी होती.

कणकवली - जिल्ह्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी जाहीर केलेला नोकरी मेळावा हा २७ पैकी एकही कंपनी येण्यास तयार नसल्याने रद्द करावा लागला. या मंडळींनी जिल्ह्यातील तरुणांची आणि त्यांच्या पालकांची घोर निराशा करून फसवणूक केल्याने आपण त्यांचा जाहीर निषेध करतो, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यासाठी हा काळा दिवस आहे. आपले तरुण देशाचे भवितव्य आहेत. तरुण स्वावलंबी झाला तर देश महासत्ता होईल. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रद्द झालेला रोजगार मिळावा म्हणजे, जिल्ह्यातील तरुणांची चेष्टा होती. या मंडळी फसवणूक करून त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी हा मेळावा जाहीर करून काही मिनिटात तो रद्द झाल्याची घोषणा केली; मात्र त्यांनी जनतेला नेमकी माहिती दिली नाही. मुळात शिवसेनेच्या मंडळींची राजकीय ताकद राहिलेली नाही. त्यांनी जिल्ह्यातील मंडळींना केवळ फसवण्याचे काम केले. गेली पाच वर्षे भूमिपूजन करत आहेत. देवगडचा आनंदवाडी प्रकल्प भूमिपूजन होऊन पुढे काय झाले.’’

ते म्हणाले,  ‘‘आम्ही कुडाळ येथे जो रोजगार मेळावा घेतला, त्याची गिनीज बुकात नोंद झाली. ११ हजार तरुणांना आम्ही नोकऱ्या दिल्या. नोकरी एक्‍सप्रेसच्या माध्यमातून राज्यभर रोजगार मेळावे घेत आहोत; मात्र शिवसेनेच्या वतीने तरुणांचा अपमान केला जात आहे. त्यांचा आपण निषेध करतो. मेळाव्यासाठी नियोजन करण्याची क्षमता या मंडळींमध्ये नाही. मेळावा रद्द झाल्यानंतर किमान तरुणांची दिलगिरी तरी व्यक्त करण्याचे धाडस या मंडळी दाखवले नाही. 

सत्तेसाठी मात्र आम्हाला मतदान करा असा असे सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना जिल्ह्यातील तरुण आणि त्यांचे पालक निष्क्रियतेचा धडा शिकवतील. उद्योग खाते शिवसेनेकडे असताना अशा पद्धतीने त्यांच्यावर नामुष्की आली असेल तर खासदार राऊत यांची क्षमता व राजकीय वजन जनतेच्या लक्षात आले असेल. गेल्या पाच वर्षात एकाही प्रकल्पाचा कार्यक्रम खासदार म्हणून आयोजित केलेला नाही. ना कुठला मोठा कारखाना येथे आणू शकले. 

दोडामार्ग एमआयडीसीला काही करता आले नाही. शिवसेना सत्तेत येऊन तरुणांना काय मिळाले. जिल्ह्यातील लोकांनी बॅंकेचे कर्ज घेऊन डंपर खरेदी केले. कर्जाखाली बुडालेल्या डंपर चालकांवर कारवाई झाली तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना संरक्षण दिलेले नाही. केवळ राणे कुटुंबीयांवर पाच वर्षे टीका करणे आणि मातोश्रीच्या कृपेने आपले पद टिकवणे हा त्यांचा खरा चेहरा आहे.’’

नाणार प्रकल्प रद्द केल्याचे श्रेय स्थानिक जनतेला 
शिवसेनेस सत्तेत राहून जैतापूरसारखा प्रकल्प रद्द करता आलेला नाही. तेव्हाही जनतेने दबाव टाकला. आता नाणार प्रकल्प रद्दची अधिसूचना काढली आहे. त्याबाबतही विश्वास नाही. जोपर्यंत गॅझेटमध्ये जाहीर प्रसिद्धी होत नाही, भूसंपादनासाठीच्या जागा घेतल्या त्या सात-बारावर एमआयडीसीचा शेरा काढला जात नाही, तोपर्यंत हा प्रकल्प कसा रद्द होईल, मुळात मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करायला हवी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane comment