नीतेश राणे यांची उदय सामंत यांच्यावर सडकून टीका

विनोद दळवी
Wednesday, 14 October 2020

अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तत्काळ शासकीय पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्री. राणे यांनी केली.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, हेच समजत नाही. त्यांच्या संघर्षामध्ये जिल्ह्याचे नुकसान होत आहे. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांसाठी जिल्ह्यात नाट्य कलावंताप्रमाणे येतात. डायलॉग मारतात, टाळ्या घेतात आणि निघून जातात. त्यांच्या प्रशासनाबरोबर होणाऱ्या बैठकांचे फलीत काय? कोरोनासाठी राखीव निधी ते खर्च करु शकलेले नाहीत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी येथे केली. 

राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तत्काळ शासकीय पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन दिले. यावेळी कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बंड्या नारकर, प्रितेश गुरव, योगेश घाडी आदी उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, "पालकमंत्री सामंत यांनी काल भात नुक़सानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या लोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटी रुपये जाहीर केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पावणे आठ कोटींच्या नुक़सानीचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहेत; मात्र यातील एक रूपयाही अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे भात नुकसानीचे पंचनामे करून उपयोग होणार का? मदत मिळणार का?
ते म्हणाले, "क्‍यार वादळात झालेल्या नुक़सानीचे 22 कोटी रुपये आल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात एकाही रूपयांची नुकसानी प्राप्त झाली नाही. एकीकडे कोरोनामुळे नागरिक आर्थिक त्रस्त असताना त्यात निसर्ग वादळाची नुकसानी मिळालेली नाही. पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या वाईट परिस्थिती आहे.'' 

ते म्हणाले, "जिल्हा नियोजनसाठी यावर्षी केवळ 47 कोटी मिळाले आहेत. त्यातील 23 कोटी कोरोनासाठी खर्च करायचे आहेत; मात्र या 23 कोटीतील केवळ 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 15 कोटी रुपये ते खर्च करू शकलेले नाहीत. रुग्ण मरताहेत. व्हेन्टीलेटर नंतर आणले गेले. त्यामुळे हा निधी शो पीस म्हणून ठेवला आहे का? नियोजन शून्य कारभार आहे. बैठका घेतात आणि अधिकाऱ्यांना कामाला लावतात. उर्वरित 23 लाखाचे नियोजन काय, याचा आढावा द्या. जिल्हा दरदोई उत्पन्नात राज्यात पहिल्या पाचमध्ये होता. कोरोनानंतर खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करणार? पर्यटन आणि अन्य व्यावसायिकांच्या आर्थिक वृद्धीसाठी काय करणार, याची माहिती देत नाहीत.'' 

अध्यादेश मिळाला का ? 
उमेद अभियान महिलांसमोर भाषण करताना सामंत यानी कोणालाही कमी करणार नाही. तसा शासन आदेश झाला आहे, असे सांगितले. त्यावर राणे म्हणाले, ""शासन आदेश प्राप्त झाला का? सामंत कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी त्याचवेळी जीआर देणे गरजेचे होते. कर्मचाऱ्यांचे पगार घालायला पैसे नाहीत. निसर्ग वादळाची नुकसानी मिळालेली नाही. अशा स्थितीत उमेदसाठी 100 कोटी देणार कोठून? केवळ जनतेसमोर भाषणबाजी करण्यात आली.'' 

सांस्कृतिक मंत्रिपद आता सामंतांना द्या 
मंत्री सामंत यांची नाट्य क्षेत्राशी जवळीक आहे. त्याप्रमाणे ते जिल्ह्यात नाटक कंपनी किंवा एखाद्या कलाकाराप्रमाणे जिल्ह्यात येतात. डायलॉग मारतात. टाळ्या मिळवितात आणि निघून जातात. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक मंत्री करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, अशी टीका राणे यांनी केली. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane criticizes Uday Samant