
असा प्रकार घडला तर मी हात काढून घेऊन जाईन, पैसे मोजायलाही हात शिल्लक राहणार नाहीत, असा सज्जड इशारा दिला.
कणकवली (सिंधुदुर्ग) : येथील उपजिल्हा रुग्णालयात यापुढे कुठलाही डॉक्टर गरिबांकडून पैसे घेताना दिसू नये. तशी हिंमत डॉक्टरांची होऊ नये; मात्र असा प्रकार घडलाच तर पैसे मोजायला हात शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज दिला.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांच्या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार नीतेश राणे यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर हे एका रुग्णांकडून २०० रुपये घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा मुद्दा मांडला. यावेळी आक्रमक झालेल्या राणेंनी, कुणाही गरिबाकडून पैसे घेण्याची हिंमत डॉक्टरांची होता कामा नये. असा प्रकार घडला तर मी हात काढून घेऊन जाईन, पैसे मोजायलाही हात शिल्लक राहणार नाहीत, असा सज्जड इशारा दिला.
हेही वाचा - ४८ तासांत भरा साडेनऊ लाख ; महावितरणने दिली नोटीस -
पैसे घेणाऱ्या डॉक्टरवर योग्य ती कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. याखेरीज कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आठवड्यातून दोनच दिवस रुग्णालयात असतात, अशी रुग्णांची तक्रार असल्याचा मुद्दा मांडला. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित डॉक्टरला नोटीस बजावणार असल्याची ग्वाही दिली.
उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना यापूर्वी खासगी ठिकाणी सीटीस्कॅन करण्याची सुविधा होती.
या सीटीस्कॅनचा खर्च शासनाकडून केला जात होता. ती योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. तर जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा आहे.
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन करून घेता येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली; मात्र इथल्या रुग्णांना ओरोस येथे ये-जा करणे खर्चिक होणार आहे. त्यामुळे कणकवलीतच सीटीस्कॅनची सुविधा करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. यावर श्री.चव्हाण यांनी याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करू, अशी ग्वाही दिली.
आजच्या चर्चेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक मेघा गांगण, शिशिर परुळेकर, डामरेचे माजी सरपंच बबलू सावंत, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, संतोष पुजारे, नितीन पाडावे, अजय घाडी आदी उपस्थित होते.
हेही वाचा - चार गुंठ्यासाठी सव्वा कोटी हे लोकांच्या हितासाठीच -
कोविड नियंत्रण निधी गेला कुठे?
कोविड निवारणार्थ जिल्हा नियोजनला २३ कोटींचा निधी आला. हा निधी कुठे खर्च झाला? उपजिल्हा रुग्णालयात भेडसावणाऱ्या कामांसाठी हा निधी का खर्च करण्यात आला नाही, असे प्रश्न आमदार राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केले.
संपादन - स्नेहल कदम