क्रिकेटपटू नितीन नरळकर याचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

चिपळूण - चिपळूणचे क्रिकेटपटू नितीन नरळकर (वय. ४५) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. नितीन यांनी क्रिकेटमध्ये चिपळूणचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची कामगिरी केली होती.

चिपळूण - चिपळूणचे क्रिकेटपटू नितीन नरळकर (वय. ४५) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. नितीन यांनी क्रिकेटमध्ये चिपळूणचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची कामगिरी केली होती. 

नव्वदच्या दशकात नितीनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इलेव्हन फायटरकडून ते खेळत होते. तडाखेबंद फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज, असा हा अष्टपैलू खेळाडू राज्यातही चमकला. मैदानावर उतरल्यानंतर भल्याभल्यांना घाम फोडून आपल्या फिरकीने नाचायला लावणारा नितीन मुंबईच्या दादा संघांनादेखील कधी दबला नाही. आपली छाप त्याने मुंबईतही उमटवली. पवन तलाव, सावर्डेतील सह्याद्रीचे मैदान, अलोरेतील पोलिस ग्राऊंडवर त्याने खेचलेले गगनचुंबी षटकार रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत.

रविवारी (ता. २३) सर्वत्र अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाची लगबग आणि मिरवणुका सुरू असताना सायंकाळी ६.३० वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. मात्र, तेव्हा घरात कोणीच नव्हते. त्यांचे बंधू माजी नगरसेवक विकी नरळकर यांनी त्यांना तत्काळ स्वतःच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. आज सकाळी शहरातील रामतीर्थ समशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Nitin Naralkar no more