निवळी ग्रामपंचायतीचे नऊही सदस्य ठरले अपात्र

निवळी ग्रामपंचायतीचे नऊही सदस्य ठरले अपात्र

चिपळूण - तालुक्‍यातील निवळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवले.  ग्रामपंचायतीच्या विहीर, रस्ता अडवणूक व विकासकामात निविदा प्रक्रिया न राबवल्याचा ठपका या सर्वांवर ठेवला आहे. एकाचवेळी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरपंच, उपसरपंचाना अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीची नामुष्की ओढवली.

निवळी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिली व तालुक्‍यातील दुसरी घटना आहे. सरपंच महेंद्र सुर्वे, उपसरपंच रेश्‍मा पवार, सदस्य गुलाब सुर्वे, मनोज घाणेकर, विलास उकार्डे, कल्पना कोदारे, रश्‍मी लाखण, सुश्‍मा यादव, दर्शना काजारे अपात्र ठरले आहेत. निवळी येथील सोपान सोनू देसाई व सुरेंद्र शिवाजीराव सुर्वे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीतर्फे चौकशी झाली. गावात शासकीय विहीर बुजविली.

ती बुजवताना पंचनामा केलेला नव्हता. तसेच शासकीय मालमत्तेची विहीर बुजवताना परवानगी घेत पंचनामा केला नाही. गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता एका व्यक्तीने अडवला होता. जिल्हा परिषद शाळेस लागून असलेल्या रस्त्यावर संरक्षण भिंत घालून वहिवाट बंद केली होती. या दोन्ही विषयावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही केलेली नाही. तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामात कामाचे 
वेगवेगळे तुकडे पाडले. या कामाची रीतसर निविदा प्रक्रिया राबवली नाही. या तिन्ही कामांचा ठपका सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर ठेवण्यात आला.

सर्व कामांच्या चौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात कोकण आयुक्तांकडे अपील दाखल झाले. कोकण आयुक्तांकडेही सुनावण्या झाल्या. सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी कामात कुचराई केल्याने कोकण आयुक्तांनी अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. 

लवकरच प्रशासक
उपसभापती शरद शिगवण दीड ते दोन वर्षापासून प्रकरणाचा पाठपुरावा करीत होते. पंचायत समितीच्या मासिक सभेस जिल्हा परिषदेतही या विषयावर वादळी चर्चा झाली होती. एकूण ९ सदस्य आहेत. चार वर्षांपूर्वी निवळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. गाव पॅनेलची ग्रामपंचायतीवर सत्ता होती. सर्व सदस्य अपात्र ठरल्याने निवळी ग्रामपंचायतीवर लवकरच प्रशासक नेमावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com