काही झाले तरी वेंगुर्ले, सावंतवाडीत युती नाहीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

केसरकरांनी अनेकांची फसवणूक केली...
तेली म्हणाले, ""पालकमंत्री केसरकर यांच्यावर विश्‍वास ठेवणे चुकीचे आहे. त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून स्वीकृत नगरसेवक पद देतो, असे सांगून अनेकांना आपले अर्ज मागे घेण्यास सांगितले; मात्र त्यानंतर त्यांची फसवणूकच केली. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.''

सावंतवाडी - आता काही झाले तरी सावंतवाडी आणि वेगुर्ले या दोन्ही पालिका भाजपा निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. पक्षश्रेष्ठींकडून युतीबाबत सूचना आल्या तरीही माघार घेणार नाही, असा इशारा माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी आज येथे दिला.

जिल्ह्यातील तीन पालिका आणि एका नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने कॉंग्रेस संपल्यात जमा आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपात थेट लढत होणार आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्‍चित आहे, असा दावाही तेली यांनी केला.त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, उमेश कोरगावकर, राजू गावडे, चंद्रकांत जाधव, उमाकांत वारंग, परशुराम चलवादी आदी उपस्थित होते.

तेली म्हणाले, ""सावंतवाडी व वेगुर्ले या दोन पालिकांमध्ये युती व्हावी अशी आमची इच्छा होती; मात्र सकारात्मक भूमिका घेण्यास पालकमंत्री केसरकर यांनी वेळकाढू भूमिका घेतली. आयत्या वेळी काय तो निर्णय घेऊ. काहीही झाले तरी युती अभंग राहील अशी भूमिका घेऊन शेवटपर्यंत खिजविण्याचे काम केले. त्यामुळे आता काही झाले तरी युती करणार नाही. ज्या ठिकाणी युतीच्या जागा लढविण्यात येणार होत्या, त्या ठिकाणी बलाढ्य उमेदवारांना संधी दिली आहे.''

सावंतवाडी व वेगुर्ला या दोन पालिका स्वबळावर लढणार आहे. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून आमची भूमिका पटवून देऊ, असेही तेली यांनी सांगितले. कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यातील चारही पालिकांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे आता त्यांची ताकद शिल्लक राहिलेली नाही. दुसरीकडे सावंतवाडी पालिकेत राजू मसूरकर आणि दिलीप नार्वेकर यांच्यासारख्या लोकांना डावलल्याने अनेक जण नाराज आहेत, असेही ते म्हणाले.

भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला त्यांना आयत्या वेळी डावलण्यात आले. याबाबत श्री. तेली यांना विचारले असता ते म्हणाले, ""सौ. कोरगावकर या पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत; मात्र आयत्या वेळी पक्षाच्या फायद्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. त्याची आम्ही पक्षाकडून समजून काढण्यात येणार आहे. त्या नक्कीच माघार घेणार आहेत.''

Web Title: No alliance in Vengurle, Sawantwadi