यापुढे शिवसेनेशी तडजोड नाही; सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी बूथनिहाय काम करणे आवश्‍यक आहे. भविष्यातील सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणते बूथ हरलो? का हरलो? त्याची कारणे शोधली पाहिजेत.

वैभववाडी - भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना - भाजप आमने सामनेच असेल. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात शिवसेनेशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले. 

कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. या सभेला भाजप नेते अतुल काळसेकर, जयदेव कदम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, सज्जन रावराणे, स्नेहतला चोरगे, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे; परंतु भाजप आणि स्वाभिमान पक्ष एकत्र असताना कोणते बुथ हरलो यांचे परीक्षण होणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ जिंकला पाहिजे. निवडणूक जिंकली यापेक्षा आपण आपला बुथ जिंकला का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी बूथनिहाय काम करणे आवश्‍यक आहे. भविष्यातील सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणते बूथ हरलो? का हरलो? त्याची कारणे शोधली पाहिजेत. भविष्यात जिल्ह्या शतप्रतिशत भाजपमय करायचा आहे. त्यासाठी सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. त्यामुळे येथून सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप आमने सामनेच असेल. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.'' 

ते म्हणाले, ""स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन झाला आहे. आता तुम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आहात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वाद असता कामा नये. आपल्यातील वादाचा विरोधकांना फायदा होईल. त्यामुळे तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोअर कमिटी स्थापन करावी. पक्षवाढीसाठी काम करणे सोयीस्कर होईल. तालुक्‍यात लवकरच होणाऱ्या ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची तयारीला आतापासूनच लागा.'' 

कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे. गरज पडली तर दोन पावले एकमेकांसाठी मागे जाण्याची तयारी ठेवा. त्यामध्ये पक्षाचे हित आहे. भाजप हा तत्त्वांवर चालणारा पक्ष आहे, या पक्षात त्यागाची नोंद ठेवली जाते. सामान्यांतील सामान्य आणि प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता उच्चपदावर पोचू शकतो. त्याला गॉडफादरची गरज लागत नाही हे फक्त भाजपत घडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीत संतोष हरयाण यांनी कर्जमाफी आणि भात नुकसानीविषयी प्रश्‍न उपस्थित केले. या वेळी अतुल काळसेकर यांनी कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची पुन्हा संधी शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे सांगतानाच खावटी कर्ज लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांगीतले. याशिवाय दुसऱ्या एका कार्यकर्त्याने घरबांधणीची परवानगीचे अधिकारी ग्रामपंचायतीकडेच हवेत अशी मागणी केली. 

पक्षांतर्गत निवडणुकीचा लवकरच कार्यक्रम 

भाजप हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. येत्या डिसेंबरपासून पक्षातंर्गत निवडणूक कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. बूथ, स्थानिय समित्या, तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीची निवड निवडणुकीद्‌वारे होणार असल्याचे श्री. जठार यांनी स्पष्ट केले. 

हातात हात हवेत 

भाजप आणि स्वाभिमान एकत्र असताना तालुक्‍यात विरोधकांना इतकी मते मिळालीच कशी अशी खंत व्यक्त करीत अरविंद रावराणे यांनी आपण सर्वानी पायात पाय नव्हे तर हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Compromise With Shivsena Sindhudurg BJP Clears