डिझेलविना एसटी गाड्या रद्दची नामुष्की 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

दरम्यान, बुधवारी सायंकाळी गुहागर-चिपळूण गाडी डिझेल नसल्याने रस्त्यातच बंद पडली. चिपळुणातून रात्री 8 व 8.30 वाजता सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. रात्री 9 वाजता सुटणारी गाडी 9.30 पर्यंत चिपळूण आगारात आली नव्हती.

गुहागर - गुहागर आगारात डिझेलअभावी काही गाड्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली. गेले दोन दिवस हा प्रकार सुरू आहे. याशिवाय अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. काल (ता. 8) चिपळूण-गुहागर ही गाडी डिझेल संपल्याने रस्त्यातच बंद पडली होती. हा सर्व प्रकार दुपारी डिझेलचा टॅंकर आल्यावर उघड झाला. तोपर्यंत कामगारांच्या असहकार आंदोलनामुळे गाड्या बंद असल्याचा प्रवाशांचा समज होता. 

गुहागर आगारात दिवसाला सुमारे चार हजार लिटर डिझेल लागते. एका टॅंकरची क्षमता 12 हजार लिटरची असते. 1 फेब्रुवारीला गुहागर आगारात टॅंकर आला होता. हे डिझेल काटकसरीने वापरण्यात येत होते. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चिपळूण, रत्नागिरी, महाड या ठिकाणी डिझेल भरण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या होत्या. मंगळवारी स्थानिक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडू नये म्हणून लांब पल्ल्याच्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या. चिपळूणमधून डिझेल भरून आलेल्या गाडीतील डिझेल काढून स्थानिक फेऱ्यांसाठी वापरायचे उद्योग आगारात सुरू होते. या संदर्भात एसटीच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, कामगारांचा पगार 7 तारखेला करण्यासाठी डिझेल टॅंकरचे आगावू पैसे भरले नव्हते. पगाराचे पैसे भरल्यानंतर डिझेल कंपनीकडे पैसे पाठवून दिल्यावर बुधवारी सायंकाळी गुहागर आगारात डिझेल टॅंकर आला. 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी गुहागर-चिपळूण गाडी डिझेल नसल्याने रस्त्यातच बंद पडली. चिपळुणातून रात्री 8 व 8.30 वाजता सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. रात्री 9 वाजता सुटणारी गाडी 9.30 पर्यंत चिपळूण आगारात आली नव्हती. त्यामुळे सुमारे 80 प्रवासी चिपळूण बस स्थानक व गुहागर नाका येथे अडकून पडले होते.

Web Title: no diesel on ST