सावंतवाडीत लॉकडाउन नाही 

रुपेश हिराप | Sunday, 27 September 2020

मास्क न वापरणाऱ्यांची गय केली जाणार नसून व्यापारी वर्गाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बाजारपेठ बंद न ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांचे मत लक्षात घेता शहरात लॉकडाउन न करता कोरोना रोखण्यासाठी आवश्‍यक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय आजच्या पालिका व व्यापारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात आला. व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांची काळजीही महत्वाची असल्याने मास्क न वापरणाऱ्यांची गय केली जाणार नसून व्यापारी वर्गाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. 

सावंतवाडीत कोरोनाची साखळी तुटण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत चर्चा करण्यासाठी आणि व्यापाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सोशल डिस्टन्स ठेवत बैठक झाली. व्यासपीठावर नगराध्यक्ष परब, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत व्यापारी वर्गांना आपले म्हणणे मांडण्याची संधी नगराध्यक्ष परब यांनी दिली. 

यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली, ते म्हणाले ""सद्यस्थिती लक्षात घेता व्यापारी वर्गाची दयनीय अवस्था आहे. काहींचे धंदे बुडाले असून कामगारांना पगार व लाईट बिल भरणे हे त्यांना मुश्‍किल बनले आहे. त्यात कर्जाचा डोंगरही व्यापारी वर्गांच्या माथ्यावर असल्याने दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. तसे पाहता बाजारामध्ये लोक येत नसल्याने बाजारपेठ सुनीसुनी असते. इतर शहराच्या मनाने सावंतवाडी शहरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी आहे. या सर्वाचा विचार करता बाजारपेठ बंद न ठेवता कोरोना संदर्भात आवश्‍यक उपाययोजना काटेकोरपणे पालिकेने राबवणे आवश्‍यक आहे.'' 

सतीश पाटणकर यांनीही आपले मत मांडताना, आज इचलकरंजीसारख्या शहरांमध्ये व्यापारी वर्गाने एकजूट दाखवली असता वीज वितरण कंपनीकडून त्यांच्या बिलात सूट देण्यात आली. त्याचप्रमाणे सावंतवाडीतही व्यापारी वर्गाने एकजूट दाखवत आवाज उठवावा. जेणेकरून विज बिल तसेच मालमत्ता कर आदींमध्ये काहीसा फायदा होऊ शकतो. बाजारपेठ बंद ठेवून कोरोना संपणार नाही, असे स्पष्ट केले.

नाभिक संघटनेचे अध्यक्ष ऍड. वैभव चव्हाण म्हणाले, ''पालिका जो निर्णय घेणार त्यामध्ये संघटना सहभागी असणार आहे; मात्र बंद ठेवायचा असल्यास तो सरसकट असला पाहिजे.'' केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आनंद रासम म्हणाले, ""आठ दिवस बंद करून कोरोनाची साखळी सुटणार नसून किमान 28 दिवस बंद ठेवणे गरजेचे आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता या व्यापारावर आलेले आर्थिक संकट लक्षात घेता लॉकडाऊन योग्य नाही; मात्र बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास आपण बंदमध्ये सहभागी असणार आहोत.''

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनीही आपले मत मांडले ते म्हणाले, ""शहरात बेफिकीर जनतेची संख्या फार आहे. यांना रोखणारे पोलीस फक्त वाहने कुठे लावायची आणि कुठे नाही हे काम पाहत आहेत. यापलीकडे मास्क वापरणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेने बंद न ठेवता व्यापाऱ्यांच्या बाजूने राहत नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत व ते घरात थांबत आहेत. अशांना उपचारासाठी पुढे येण्यासाठी पालिकेने आवाहन करणे गरजेचे आहे.'' दरम्यान, व्यापारी संघाचे बाळ बोर्डेकर, पुंडलिक दळवी, जितेंद्र पंडीत, नरेंद्र देशपाडे, कृणाल शृंगारे, हेमंत बांदेकर, अजय गोंदावले, बंटी पुरोहित, हर्षवर्धन धारणकर, राजन पवार आदी उपस्थित होते. 

...तर दंडात्मक कारवाई 
एकूणच बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत सर्वांकडून आलेले मत लक्षात घेता शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला; मात्र उद्यापासून शहरातील व्यापारी वर्ग किंवा प्रतिष्ठित व्यक्ती कोणीही विनामास्क आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले. या बैठकीला लोबो यांनीही मार्गदर्शन करत कोरोना रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.

संपादन- राहुल पाटील