शिक्षकांचा जानेवारीचा पगार रखडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

शासन निर्णयानुसार कर्मचारी वेतन महिन्याच्या 1 ते 5 दिनांकापर्यंत होणे आवश्‍यक आहे. पगार वेळेत न झाल्याने शिक्षकांना कौटुंबिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते

सिंधुदुर्गनगरी - प्राथमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांच्या पगारास सतत विलंब होत आहे. जानेवारीचा पगार अद्याप झालेला नाही. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांचा पगार जमा न झाल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता 17 ला जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक भारती सिंधुदुर्गतर्फे देण्यात आला. याबाबतचे निवेदन आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांना देण्यात आले.

राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गतर्फे आज शिक्षणाधिकारी गजानन गणबावले व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन प्राथमिक शिक्षकांच्या वेतन देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत लक्ष वेधले. या वेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, महेश नाईक, रुपेश वालावलकर, संतोष कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांचे पगार आज (ता.10) पर्यंत जमा झालेले नाहीत. 30 दिवस काम केल्यानंतर 1 तारखेला वेतन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. शासन निर्णयानुसार कर्मचारी वेतन महिन्याच्या 1 ते 5 दिनांकापर्यंत होणे आवश्‍यक आहे. पगार वेळेत न झाल्याने शिक्षकांना कौटुंबिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. वेतन 6 फेब्रुवारीनंतर झाल्याने बॅंकमधील कर्ज हप्त्यांना पेनल्टी बसून जादा रक्कम कपात होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होतो.

चार महिन्यांपासून सतत विलंब
गेल्या चार महिन्यांपासून पगारास सतत विलंब होत आहे. आपल्या कार्यालयाकडून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी न झाल्याने 7 जुलै 2007 च्या शासन निर्णयानुसार अधिदान व लेखाधिकारी/कोषागार अधिकारी यांनी वेतन देयक संमत न केल्याने यास शासन आदेशानुसार शिक्षण विभाग जबाबदार आहे. यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांचा पगार त्यांच्या बॅंक खाती जमा न झाल्यास 17 फेब्रुवारीला जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनाही देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

Web Title: no salary for teachers