नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

कर्जत - मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी आर्थिक आणीबाणी ठरली असल्याची टीका आमदार सुरेश लाड यांनी केली. कर्जत राष्ट्रवादी कॉंग्रेसने नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते. 

कर्जत - मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी आर्थिक आणीबाणी ठरली असल्याची टीका आमदार सुरेश लाड यांनी केली. कर्जत राष्ट्रवादी कॉंग्रेसने नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते. 

लाड म्हणाले की, मोदी सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कॅशलेस व्यवहाराचा निर्णय चुकीचा आहे. देशातील पन्नास टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. कित्येक जणांचे तर बॅंकेत साधे खातेही नाही. ज्यांची बॅंकेत खाती आहेत त्यांना रांगेत उभे राहूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सहकारी बॅंकांना चलन दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज; तसेच इतर बाबींचा लाभ घेता येत नाही. सरकारची ही जुलूमशाही, दडपशाही आहे. 

हा मोर्चा टिळक चौकातून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा रोखला. त्याचे रूपांतर सभेत झाले. शेतजमिनीतून जाणाऱ्या रिलायन्स गॅस वाहिनीसंदर्भातील अहवाल 17 जानेवारीला सादर होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी आपली पुढील भूमिका स्पष्ट करील. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकदा नाही; तर अनेक वेळा मी तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे लाड यांनी सांगितले. 

या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, तालुकाप्रमुख अशोक भोपतराव, माजी सभापती तानाजी चव्हाण, शहर अध्यक्ष शरद लाड, नगराध्यक्ष रजनी गायकवाड, उपनगराध्यक्ष अर्चना बैलमारे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, स्मिता पतंगे, जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे, महिला तालुकाध्यक्ष हिरा दुबे, नगरसेविका पुष्पा दगडे आदी नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाल्या. 

Web Title: Notes ban decision financial emergency