एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी गिरविले अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

pali
pali

पाली - (वार्ताहर) येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयातील एनएसएस च्या विद्यार्थ्याचे शिबिर सिद्धेश्वर येथे आयोजित केले आहे. या विद्यार्थ्यांसमोर रविवारी (ता. 23) रात्री महा. अंनिस रायगड आणि पाली शाखेतर्फे चमत्काराचे प्रयोग सादर करण्यात आले. या  माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. 

यावेळी महा. अंनिस रायगड शाखेचे कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी विदयार्थ्यांना अंनिसची त्रिसूत्री समजावून सांगितली. अंधश्रद्धा कोणत्या प्रकारच्या असतात ते सांगितले. त्यांनतर भोईर आणि महा. अंनिस पाली शाखेचे प्रधान सचिव अमित निंबाळकर यांनी हवेतून चेंन काढणे, हातातून अंगारा देणे, प्रश्नचिन्हावर पट्टा तोलने, तोडलेली दोरी पुन्हा जोडणे, पेटता कापूर हातावर नाचविणे व तोंडात ठेवणे, अंगावर जळता पलीता फिरविणे, जिभेतून तार आरपार टाकणे, नारळातून लाल व काळी रिबीन, मणी आणि बांगड्यांचे तुकडे काढणे, पाण्याचा दिवा पेटविणे, जिभेतून तार आरपार काढणे, जादुई कमंडलू आदी रंजक प्रयोग सादर केले. तसेच या प्रयोगातील विज्ञान व कार्यकारणभाव समजावून सांगून त्याबद्दल प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा यातील अनेक प्रयोग स्वतः करून याची सत्यता पडताळली. 

लिंबू-मिर्ची लावून आपण लाखो लिंबू कसे फुकट घालवतो हे सांगितले. अशा प्रकारच्या चमत्कारांवर केलेला अंधविश्वास म्हणजे अंधश्रद्धा. बुवा-बाबा देवाचे व धर्माचे नाव घेऊन अंधश्रद्धा पसरवतात. सिद्धी वैगेरे काही नसते. प्रत्येकाला आपल्या डोक्यात सतत प्रश्न पडले पाहिजेत. अंगात येणे, भूत प्रेत व महिलांचे शोषण यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंका आणि प्रश्नांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निराकरण करण्यात आले. 

शोषण करणारी कुठलीही अंधश्रद्धा असेल तर तिला आपण विरोध केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे,  तर्क, निरीक्षण, अनुमान व प्रयोग  हे वैज्ञानिक दृष्टीकोणाचे टप्पे आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करणे. शिक्षणाचा आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा काही संबंध नसतो. गाडगे महाराज 3 री शिकले असतांना देखील त्यांनी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करून त्याचा प्रचार प्रसार केला. हे समजावून सांगितले. 

या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ समन्वयक बी. एस. बिडवे, राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर, प्रा. अंजली व सुधीर पुराणिक, प्रा. शांतिकुमार खैरनार, डॉ. अंकुश सोहनी, प्रा. राकेश शिर्के, प्रा. दीप्ती लखीमळे, सीनियर लीडर राज ठाकूर व मानसी साळुंखे तसेच अंनिस कार्यकर्ते रोशन रुईकर, शिक्षक संतोष भोईर व एनएसएस चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलील पुराणिक याने केले.

जगात संघटित होऊन अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम दाभोलकरांनी केले. अंधश्रद्धा हा शब्द ही अंनिसची देणं आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंनिसच्या माध्यमाने झाला. जगातली ही एकमेव संघटना आहे ज्यांचा कोणताही लोकप्रतिनिधी नसतांना त्यांनी कायदा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com