देवरहाटी झाडे तोडल्याने नऊजणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

गुहागर - तालुक्‍यातील झोंबडी येथील ग्रामदेवतेच्या देवरहाटीतील झाडे तोडल्याने 9 मजुरांवर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील तक्रार चिखलीचे मंडल अधिकारी विजय जाधव यांनी गुहागर पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

गुहागर - तालुक्‍यातील झोंबडी येथील ग्रामदेवतेच्या देवरहाटीतील झाडे तोडल्याने 9 मजुरांवर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील तक्रार चिखलीचे मंडल अधिकारी विजय जाधव यांनी गुहागर पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

झोंबडीचे ग्रामदैवत काळभैरव मंदिराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना पैशांची व्यवस्था करायची होती. त्यासाठी गावाच्या बैठकीमध्ये देवरहाटीच्या जागेत असलेले वृक्ष तोडण्याचा निर्णय गावच्या बैठकीत घेण्यात आला. ऍकेशिया, किंजळ व कुडाची मोठी झाडे वनखात्याची परवानगी न घेता तोडण्यात आली. याची माहिती मिळताच वनपाल सुधाकर गुरव यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथे 23 झाडे तोडून केलेले 48 नग जप्त करून गुरव यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. महसूल विभागाच्या ताब्यात देवरहाटी येत असल्याने या घटनेचा पंचनामा तहसीलदार वैशाली पाटील यांना केला.

या प्रकरणात पोलिसांनी गावप्रमुखांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशाच प्रकारची घटना सुमारे पाच वर्षांपूर्वी धोपावे येथे घडली होती. त्यामुळे देवरहाटीमधील संपत्तीवर हक्क नेमका कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामदैवताची पूजा व्हावी यासाठी नेमलेल्या व्यक्तीचा चरितार्थ चालविण्यासाठी गावातील काही जमीन देवाच्या नावाने फार पूर्वीपासून देण्यात आली आहे. या जागेला अनेक ठिकाणी देवरहाटी म्हटले जाते. शासन व्यवस्थेमध्ये सर्व ठिकाणच्या देवरहाट्या महसूल विभागाच्या ताब्यात आहेत; परंतु शिमगोत्सव, देवदिवाळी, दिवाळी, पोत बांधणे असे ग्रामदेवतेचे वर्ष सण गाव वर्गणी काढून साजरे करतो. या मंदिरांना उत्पन्नाचा अन्य मार्ग नाही. त्यामुळे मंदिराच्या बांधकामासारख्या मोठ्या खर्चासाठी देवरहाटीमधील जुनाट वृक्षांची तोड केली जाते. दुर्गम भागातील विषय शासनापर्यंत पोचत नाही; परंतु गावातील वैयक्तिक वादातून जाणीवपूर्वक काही ठिकाणी तक्रारी दाखल होतात. अशा तक्रारी दाखल झाल्या की शासन कायद्याप्रमाणे कारवाई करते. त्यामध्ये गावगाडा सांभाळणाऱ्या कायद्याबद्दल अज्ञान असलेल्या ग्रामस्थांना भीती दाखवून कायद्याचे रक्षक अन्य मार्गांनी अन्याय करतात.
आज तालुक्‍यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे जंगलतोड होते. त्यामधील काहीजणांवरच संबंधित खात्याकडून कारवाई होते. बहुतांश ठिकाणी अर्थपूर्ण दुर्लक्ष होते. शासन वृक्षतोडीचे परवानेही देते. गौणखनिज उत्खननामध्येही अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र गावाच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन निर्णय केला तरीही केवळ देवरहाटीतील झाडे तोडल्यावर परवानगी घेतली नाही, या एका मुद्द्यावरून फौजदारी कारवाई केली जाते, असा विरोधाभास आहे.

गावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वत:च्या जमिनी देऊन पूर्वजांनी देवरहाट्या उभ्या केल्या. शासनाने त्या ताब्यात घेतल्या. गावातील देवरहाटीचे अधिकार गावाकडे द्यावेत किंवा शासनाने वर्षभरातील उत्सवांसाठी व देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्वीकारावी. तसेच गावाला पाहिजे तशी गावमंदिरांची दुरुस्ती करून द्यावी.
- भालचंद्र निमकर, गुहागर

Web Title: Offence against nine peoples for cutting tree