कासव महोत्सवाची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मंडणगड, - वेळास किनाऱ्यावर हमखास कासवांचे नेस्टिंग होते. अंड्यांची संख्या हजारांचा घरात जाते. कासव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत, निसर्गप्रेमी, पर्यटक, तालुकवासीय आवर्जून उपस्थित राहतात. कासवांमुळे वेळास जगाच्या नकाशावर झळकले आहे. यावर्षी आतापासून पर्यटक उत्सकतेपोटी महोत्सवाबाबत चौकशी करत असून पर्यटन हंगाम संपल्यानंतरही त्यांना वेळासमध्ये येण्याची इच्छा आहे, अशी माहिती हेमंत सालदूरकर यांनी दिली.

मंडणगड, - वेळास किनाऱ्यावर हमखास कासवांचे नेस्टिंग होते. अंड्यांची संख्या हजारांचा घरात जाते. कासव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत, निसर्गप्रेमी, पर्यटक, तालुकवासीय आवर्जून उपस्थित राहतात. कासवांमुळे वेळास जगाच्या नकाशावर झळकले आहे. यावर्षी आतापासून पर्यटक उत्सकतेपोटी महोत्सवाबाबत चौकशी करत असून पर्यटन हंगाम संपल्यानंतरही त्यांना वेळासमध्ये येण्याची इच्छा आहे, अशी माहिती हेमंत सालदूरकर यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून हेमंत सालदूरकर आणि इतर ग्रामस्थ कासव संवर्धनाची धुरा वाहत आहेत. सालदूरकर म्हणाले की, साधारणतः नोव्हेंबर ते मार्च हा काळ या कासवांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येते. बहुतेक वेळेला ही मादी मध्यरात्री किनाऱ्यावर येते. भरतीची वेळ या कासवांना सोयीची असते. भरती ओहोटीची गणिते जुळवुनच या माद्या किनाऱ्यावर येतात.  

अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर एक वैशिष्ट्‌यपूर्ण नक्षी रेखाटून जातात. या माद्या अंडी घालून समुद्रात परत गेल्या की, कासव संवर्धनाचे काम सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. रात्री कासवांनी घरटे करुन अंडी घातली की, दोन ते तीन तासांच्या कालावधीतच ही घरटी शोधून त्यामधील अंडी ही सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात.

कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत ही घरटी शोधावी लागतात. घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्या घरट्यातल्या अंड्याची नोंद केली जाते. नंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात आणली जातात. तिथे पुन्हा तेवढ्याच खोलीचा खड्डा करुन त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली जातात. अंडी पुरल्यानंतर त्या खड्यावर घरटे सापडले तो दिवस आणि तारीख लिहिली जाते. तसेच अंदाजे अंड्यातून पिल्ले कधी बाहेर येतील याचा दिनांकही लिहीला जातो. गेल्यावर्षी २१ जानेवारीच्या दरम्यान याला सुरवात झाली होती. यावर्षीही तोच कालावधी येण्याची शक्‍यता आहे.

स्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण
कासवाची जेव्हा अंडी घालते तेव्हा ती त्या अंड्याभोवताली एक विशिष्ट प्रकारच्या स्राव त्या घरट्यात आणि रेतीत सोडत असते. त्या स्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण होते. त्यामुळे अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना मूळ घरट्यातील ही स्रावमिश्रित मातीही हलवावी लागते. जेणेकरून अंड्यांना नैसर्गिक संरक्षण मिळेल. 

ती निघून जाते, कधीही न परतण्यासाठी...
किनाऱ्यावर आल्यानंतर पाण्यापासून अंदाजे पन्नास ते ऐंशी मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करून मादी अंडी घालते. या खड्ड्यावर पुन्हा आपल्या वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ही मादी पुन्हा समुद्रात निघून जाते, कधीही न परतण्यासाठी.

Web Title: Olive ridley sea turtle festival special