गोव्यातून आणत होता दारू पण, पोलिसांनी रात्रीतच संपवला खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ येथील पथकाने डेगवे-हात येथे कारवाई केली. कारवाईत 22 लाख 34 हजार चारशे रुपयांची गोवा बनावटीची दारू व सुमारे दहा लाखांचे वाहन असा एकूण 32 लाख 34 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी सुरेश तानाजी पवार (वय 23) व अजित बाळासाहेब सावंत (28, रा. बनाळी ता. जत, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल (ता.1) सायंकाळी उशिरा करण्यात आली.

बांदा - गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ येथील पथकाने डेगवे-हात येथे कारवाई केली. कारवाईत 22 लाख 34 हजार चारशे रुपयांची गोवा बनावटीची दारू व सुमारे दहा लाखांचे वाहन असा एकूण 32 लाख 34 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी सुरेश तानाजी पवार (वय 23) व अजित बाळासाहेब सावंत (28, रा. बनाळी ता. जत, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल (ता.1) सायंकाळी उशिरा करण्यात आली.

 याबाबत माहिती अशी, कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याचे गोपनीय वृत्त मिळाले होते. त्यानुसार पथकातील कर्मचारी बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे येथे सापळा रचून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत होते. याच दरम्यान बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने जाणारा कॅन्टर (एमएच 10 डब्लू 7961) आला. येथील कर्मचाऱ्यानी थांबण्याचा इशारा केला. चालकाने गाडी तिथे न थांबवता पुढे नेऊन थांबविली. गाडीची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात ताडपत्रीच्या खाली दारू लपवून ठेवण्यात आली होती. 

यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रॅंडचे 320 बॉक्‍स आढळून आले. दारूची किंमत 22 लाख 34 हजार 400 रुपये असून गाडीची किंमत 10 लाख असा एकूण 32 लाख 34 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने ताब्यात घेतला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, एन. पी. रोटे, सी. डी. पवार, सी. एल. कदम, चालक एच. आर. वस्त, प्रसाद माळी, शिवशंकर मुपडे, यांच्यासह कुडाळ कार्यालय पथकाच्या कर्मचारी यांनी केली. 

स्थानिक यंत्रणा काय कामाची ? 
बांदा सीमेलगत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे; मात्र असे असतानाही कुडाळ कार्यालयाच्या पथकाने यांच्या हद्दीत येऊन नाकावर टिच्चून कारवाई केली. यामुळे या तपासणी नाक्‍याचा त्यांना हिरवा कंदील होता की काय असा सवाल उपस्थित होत आहे. 

दारू चोरीसाठी नवा मार्ग 
दारू तस्करी करणाऱ्यांनी नवा मार्ग शोधल्याचे या कारवाईतून पुढे आले. गेल्या वर्षीपासून तळकट-कुंभवडे-खडपडेमार्गे चौकुळपर्यंतचा रस्ता खुला झाला आहे. गोव्यातील दारू पत्रादेवी-बांदा मार्गे डेगवे व तेथून तळकट येथे आणल्यास या मार्गात फारशी तपासणी होत नाही. तेथून नव्या मार्गाने पारगडमार्गे चंदगड किंवा आंबोलीची पोलिस चौकी बायपास करून पुढे निघणाऱ्या रस्त्यातून कोल्हापूरकडे जाता येते. ही दारू याच मार्गे नेली जात असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested with illegal wines