पिता-पुत्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

खेड : वणौशी (ता. दापोली) येथील नातू-बौद्धवाडी येथे भावकीतील वादातून जाधव व मोहिते कुटुंबीयांमध्ये झालेल्या भांडणातून तुकाराम महादेव जाधव व अनंत तुकाराम जाधव या पिता-पुत्राचा खून झाला होता. 10 मार्च 2004 ला सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. या खूनप्रकरणी मुख्य आरोपी प्रभाकर पांडुरंग मोहिते (वय 61) याला जन्मठेपेची, तर त्याच्या तीन मुलांना सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याच प्रकरणात हाणामारी झाल्यामुळे जाधव कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यापैकी तीन जणांना तीन वर्षे सश्रम करावासाची आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली.

जाधव पिता-पुत्रांना झालेल्या मारहाणीत मुख्य आरोपी प्रभाकर मोहितेच्या तीनही मुलांनी भाग घेतल्याने त्यांनाही शिक्षा झाली आहे. प्रवीण प्रभाकर मोहिते (वय 36) याला दहा वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाची कैद तसेच आरोपी प्रफुल्ल प्रभाकर मोहिते (वय 33) व नीलेश प्रभाकर मोहिते (वय 31) यांना तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीची पत्नी सौ. कल्पना प्रभाकर मोहिते हिला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. प्रभाकर मोहिते आणि त्यांच्या मुलांनी कुऱ्हाडीने, कोयतीने जाधव पिता-पुत्रांच्या डोक्‍यावर, कपाळावर, तोंडावर, पायावर मारहाण केली होती. मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला, तर अन्य जखमी झाले होते.

तत्कालीन अंमलदार पी. जी. माने यांनी तपासकाम पूर्ण करून दोषारोप दाखल केले. खेड येथील जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 बी. डी. शेळके यांच्यासमोर हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे ऍड. शेट्ये आणि त्यानंतर ऍड. मेघना सुहास नलावडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा दिली.

या प्रकरणात आरोपी मोहिते यांच्या वतीनेही जाधव कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. जाधव कुटुंबीयांपैकी वसंत तुकाराम जाधव, शैलेश अनंत जाधव, सुरेंद्र अनंत जाधव यांना तीन वर्षे सश्रम करावासाची शिक्षा तसेच तीन हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. कणसेकर यांनी काम पाहिले.

Web Title: one sentenced to life term