सिंधुदुर्गात अवघ्या 58 टक्के शाळा सुरू 

विनोद दळवी 
Wednesday, 2 December 2020

जिल्ह्यात आता शाळा सुरू होण्यास वेग आला आहे. पाहिल्या आठ दिवसांत 144 शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण 242 शाळा असून त्यातील 98 शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 318 शिक्षक आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 144 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 58 टक्के शाळा सुरू झाल्या असून 42 टक्के शाळांची घंटा अजून वाजलेली नाही. राज्य शासनाने कोरोनामुळे जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होवून सुद्धा शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. शाळा सुरू झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल या भीतीने 2020-21 चे शैक्षणिक वर्ष सुरुच केले नव्हते; मात्र नोव्हेंबरमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावी वर्ग भरविण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 82 शाळा भरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 5 शाळा सुरू झाल्या होत्या. 

जिल्ह्यात आता शाळा सुरू होण्यास वेग आला आहे. पाहिल्या आठ दिवसांत 144 शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण 242 शाळा असून त्यातील 98 शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 318 शिक्षक आहेत. त्यातील 2 हजार 146 शिक्षकांची टेस्ट घेण्यात आली. 850 या सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची टेस्ट घेण्यात आली आहे. 42 हजार एवढे विद्यार्थी असून यातील 9 हजार 46 विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या 21 टक्के विद्यार्थी शाळेत हजर झाले असून तब्बल 79 टक्के विद्यार्थी अजुन दाखल झालेले नाहीत. 

"त्या' मुख्याध्यापकांना नोटीस 
कुडाळ तालुक्‍यातील माणगाव परिसरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांची कोरोना टेस्ट अहवाल येण्यापुर्वी शाळा सुरू केली. टेस्ट दिलेला एक शिक्षक कोरोना बाधित आला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना विचारले असता त्यांनी याबाबत मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेली मुलगे आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. आरोग्य विभागाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्यावर ही शाळा सुरू होईल, असे सांगितले. 

एकूण 25 बाधित 
जिल्ह्यातील 2 हजार 146 पैकी 19 शिक्षक तर 850 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 25 बाधित आढळले आहेत. 

मुलांच्या प्रवासाचा प्रश्‍न 
देवगड - शासनाच्या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा फतवा आला असल्याने विविध ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या; मात्र शाळांमध्ये अजूनही म्हणावा तसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये येण्यामध्ये काही अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सुमारे मार्चपासून शाळांची घंटा वाजलेली नाही. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा असताना अलीकडे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. त्यानंतरच शाळा सुरू झाल्या. अलीकडे तालुक्‍यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्याला विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसते. दूरवरच्या शाळांमध्ये जाण्यासाठी एसटीची सोय आवश्‍यक आहे; मात्र पाचवीपासून वर्ग सुरू झाले नसल्याने एसटी प्रशासनाने शालेय फेऱ्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येण्यासाठी एसटीची सोय नसल्याचेही यामध्ये कारण सांगितले जात आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असल्याचे सांगितले जाते. 

 

जिल्ह्यात सध्या 144 शाळा सुरू झाल्या असल्या तरी उर्वरित 98 शाळा लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 
- अशोक कडूस, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 58 schools open Sindhudurg district