अवघ्या पाच वर्षाचा लहानगा सराईतपणे चालवितो बैलगाडी

अमित गवळे 
Tuesday, 4 June 2019

पालीतील वेदांत विजय यादव हा अवघ्या पाच वर्षाचा लहानगा सराईतपणे बैलगाडी चालवितो. त्याला पाहून असे वाटते की गावखेड्यातील ही बैलगाडी चालविण्याची परंपरा व कौशल्य भावी पिढी पुढे चालविणार आहे.

पाली (जि. रायगड) : विज्ञान व तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दाखविले आहेत. दळणवळणाच्या साधनांमध्ये देखील अमुलाग्र बदल झाला आहे. मात्र अजुनही काही गाव खेड्यातील लोक शेतीसाठी व विविध कामांसाठी बैलगाडीचा वापर करतांना दिसत आहे. पालीतील वेदांत विजय यादव हा अवघ्या पाच वर्षाचा लहानगा सराईतपणे बैलगाडी चालवितो. त्याला पाहून असे वाटते की गावखेड्यातील ही बैलगाडी चालविण्याची परंपरा व कौशल्य भावी पिढी पुढे चालविणार आहे.

पाली नांदगाव मार्गावर मंगळवारी (ता. 4) सकाळी अडुळसे गावाजवळ पाण्याचा पिंप नेणारी एक बैलगाडी दिसली. आश्चर्याची बाब म्हणजे ही बैलागाडी एक लहानगा चालवत होता. अगदी सराईतपणे व अनुभवी व्यक्तीप्रमाणे हा मुलगा बैलगाडी हाकत होता. चालता चालताच त्याच्याशी संवाद साधला. वेदांत विजय यादव असे या लहानग्याने आपले नाव अगदी आत्मविश्वासाने सांगितले. बैलगाडी चालवितांना भिती वाटते का? तर नाही म्हणाला, उलट खूप मज्जा येते असे त्याने सांगितले. पाठीमागून वेदांतचा मामा येत होता. त्याने सांगितले की, वेदांत पालीत राहतो. यावर्षी तो पहिलीला जाणार आहे. त्यांनीच त्याला बैलगाडी चालविण्यास शिकविली आहे. बैलांचा कासरा कसा ओढावा, बैलगाडी कशी पुढे न्यावी, कशी थांबवावी, वळवावी, बैलांना सांकेतिक आवाज कसा द्यावा हे सर्व वेदांत उत्तम प्रकारे करतो. आजुबाजूने जाणारी अनेक माणसे त्याला बैलगाडी चालवितांना बघून आश्चर्य व्यक्त करत जात होती. वेदांतला पाहून तो बैलगाडी चालविण्याचे कौशल्य व परंपरा नक्की पुढे चालवेल असे वाटते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only five year old boy drives bullock cart easily at pali raigad