मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ‘उघड्यावरचं ग्रंथालय’

मकरंद पटवर्धन
शनिवार, 6 मे 2017

डॉ. निधी पटवर्धनांची संकल्पना - उर्दू, हिंदी व इंग्रजी पुस्तकांची गरज; झोपडपट्टीतील मुलांचा सहभाग

रत्नागिरी - मुले शिकली पाहिजेत व त्यांना बालवयापासूनच वाचनाची गोडी लागली पाहिजे, त्यांच्यातील ऊर्जा वाचनासाठीही उपयोगात यावी, म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. निधी पटवर्धन यांनी ‘उघड्यावरचं ग्रंथालय’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे.

शहराजवळील भाट्ये परिसरातील झोपडपट्टीतील मुले या उपक्रमात आनंदाने सहभागी होत आहेत.

डॉ. पटवर्धन यांनी गुढी पाडव्यापासून सायकलवरून रपेट सुरू केली. भाट्ये परिसरात फिरताना त्यांना अनेक मुले मासे पकडताना, खेळताना, पाणी भरताना, गप्पा मारताना पाहायला मिळाली. साधारण पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या या मुलांमधील ऊर्जा फक्त भटकंतीसाठी फुकट जाण्याऐवजी ती वाचनाच्या कारणी लागावी या हेतूने ‘उघड्यावरचं ग्रंथालय’ साकारण्याची कल्पना त्यांना सुचली. सुरवातीला नऊ मुलांना घेऊन त्यांनी या ग्रंथालयाला तीन दिवसांपूर्वी सुरवात केली. आता १५ मुले यात सहभागी झाली आहेत. या मुलांना मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजीची ५० पुस्तके दिली आहेत.

कर्नाटकातून पाहुणे म्हणून आलेली काही मुले इंग्रजी पुस्तके वाचू लागली आहेत. भाट्येच्या झोपडपट्टीतील अफसाना व सिमरन या दोन विद्यार्थिनी हे ग्रंथालय सांभाळतात. सुरवातीला डॉ. पटवर्धन यांनी मुलांना गाणी ऐकवली. कथा वाचून दाखवल्या. उज्ज्वला विद्वांस यांनी बॅग दिली, नेत्रा पालकर यांनी फास्टर फेणे व लीलावती भागवत, सुमती पायगावकर यांची दुर्मिळ पुस्तके देऊ केली. गंधाली शिंदे यांनी वयम्‌ अंकाचे तीन वर्षांचे अंक दिले. मात्र भरपूर पुस्तके वाचण्यासाठी न देता एकेक पुस्तक नोंदवून दिले जात आहे. पहिली ५० पुस्तके वाचून झाल्यावर आणखी पुस्तके दिली जाणार आहेत. या ग्रंथालयासाठी पुस्तके देण्याचे आवाहन केल्यावर त्याला अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुस्तकांची नोंदणी, स्टीकर लावणे व ग्रंथालयाची शिस्त अशा कामांसाठी डॉ. पटवर्धन यांना विद्यार्थी ओंकार मुळ्ये मदत करतो. मुंबईतील एका प्राध्यापकाने मागणी नोंदवाल तशी पुस्तके देऊ, अशी ग्वाही दिली आहे. तसेच पेम संस्थेने खुर्ची, कपाट व पुस्तकांसाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे. या ग्रंथालयासाठी वाचकप्रेमी दानशूर नागरिकांनी मदत करावी, असे आवाहनही केले आहे. यासाठी घरातील जुने, वापरलेले पुस्तक चालेल. साधारण पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता कथा, कविता, स्वातंत्र्यसैनिकांची पुस्तके, चरित्रे अशी पुस्तकेही देता येतील. तसेच कुलूप किल्ली, सतरंजी, खुर्ची, पाणी पिण्याची बाटली, महिन्यातून एकदा स्वेच्छेने खाऊ अशी मदतही स्वीकारली जाणार आहे, अशी माहिती 
डॉ. पटवर्धन यांनी दिली.

Web Title: open library in ratnagiri by dr. nidhi patwardhan