रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना एक्सप्रेस करण्यास कोकणवासीयांचा विरोध

Opposition of Konkan people to express railway passenger trains
Opposition of Konkan people to express railway passenger trains

चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावर धावणर्‍या रेल्वेगाड्यांपैकी दोन लोकल रेल्वे एक्सप्रेस करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांच्या दृष्टीने महामंडळाचा हा निर्णय त्रासाचा आणि आर्थिक भुर्दंड लावणारा आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातून या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे.
 

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी मडगाव, मडगाव रत्नागिरी आणि दिवा सावंतवाडी, सावंतवाडी दिवा या दोन लोकल रेल्वे गाड्या धावतात. या रेल्वेने 50 रुपयात चिपळूणातून मुंबई आणि मुंबईतून चिपळूणला प्रवास करता येतो. सामान्य लोकांसाठी ही रेल्वे फायद्याची आहे. चिपळूण तालुक्यातील आरवली, कामथे, सावर्डे आणि खेड तालुक्यातील अंजनी येथील रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबते. त्यामुळे या परिसरातील लोकांना सोयीच्या स्थानकावर उतरून घर गाठता येते. 

चिपळूण आणि खेड तालुक्यातील शेकडो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. नोकरदार वर्गासाठी सुद्धा ही रेल्वे फायद्याची आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्या एक्सप्रेस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीटदर वाढणार आहे. त्याशिवाय लोकल स्थानकावर ही रेल्वे थांबणार नाही. आरवली, कामथे, सावर्डे, अंजनी या स्थानकावर ही रेल्वे थांबणार नाही. खेड, चिपळूण आणि रत्नागिरी वगळता जिल्ह्यातील इतर लोकल स्थानकावरही ही रेल्वे थांबणार नाही. तिकीटदरही वाढणार आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने हे गैरसोयीचे आहे. या लोकल रेल्वेने पूर्वी पन्नास रूपयात प्रवास करता येत होते. रिक्षाला 150 रुपये देवून घर गाठता येत होते. आता रेल्वेच्या तिकीटासाठी किमान 150 रुपये मोजावे लागणार आहे. त्याशिवाय रिक्षा, खासगी वाहतूक किंवा एसटीने प्रवास करायचे झाल्यास अंतरही वाढणार असल्यामुळे प्रवाशांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. म्हणजे पूर्वी दिडशे ते दोनशे रुपयात होणारा प्रवास आता पाचशे रुपयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे.

 रत्नागिरी मडगाव आणि दिवा सावंतवाडी या दोन्ही रेल्वे आम्ही एक्सप्रेस होऊ देणार नाही. त्यांचे थांबेही बंद होऊ देणार नाही. रेल्वे प्रशासनाने ग्राहकांच्या सोयीसाठी एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवावी. आमचे सहकार्य असेल. रेल्वेने लोकल गाड्या बंद केल्यास आम्ही आंदोलन करू.

-शौकत मुकादम, अध्यक्ष कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती रत्नागिरी 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com