कर्जतच्या मातीत जळगावची केळी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नेरळ - फार्म हाऊसचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्‍यातील बहुतांश शेतघरांचा आराखडा तयार करणारे वास्तुविशारद संजय नथुराम हरपुडे हे सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यांनी कशेळे येथे जळगावच्या प्रसिद्ध केळीची येथे लागवड केली आहे. टिश्‍यू कल्चर पद्धतीने विकसित केलेल्या या रोपांना 30 किलो वजनाचे घड लागणे अपेक्षित आहे. 

नेरळ - फार्म हाऊसचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्‍यातील बहुतांश शेतघरांचा आराखडा तयार करणारे वास्तुविशारद संजय नथुराम हरपुडे हे सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यांनी कशेळे येथे जळगावच्या प्रसिद्ध केळीची येथे लागवड केली आहे. टिश्‍यू कल्चर पद्धतीने विकसित केलेल्या या रोपांना 30 किलो वजनाचे घड लागणे अपेक्षित आहे. 

कशेळे गावातील ह.भ.प. नथुराम हरपुडे यांच्या दोन्ही पुत्रांनी कर्जत तालुक्‍यात त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात नाव कमावले आहे. कामाच्या व्यापामुळे त्यांना गावाकडे शेती करणे शक्‍य होत नव्हते. संजय यांनी आराखडा तयार केलेल्या अनेक वास्तू मुंबई-पुण्यातही उभ्या आहेत. यापैकीच एक म्हणजे सद्‌गुरू वामनराव पै यांचे जीवन विद्यापीठ. अशा या "बिझी' व्यवसायातून अन्य ठिकाणी डोकावण्यासाठी त्यांना वेळ नसायचा; परंतु शेती टिकली तर आपल्या भागात पर्यटनासाठी लोक येतील, हे मनोमन पटलेल्या संजय यांनी प्रगत शेती करण्याचा निर्णय घेतला. आज कर्जत तालुक्‍यात भाजीपाला ते फळपिकापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रगत शेती केली जात आहे. त्यात संजय यांच्या केळीच्या बागेची भर पडली आहे. 

कशेळे हे बाजारहाटीचे ठिकाण आहे. या गावात कर्जत-मुरबाड या राज्यमार्गाजवळ हरपुडे यांची माळवरकस जमीन आहे. अनेक वर्षे पडीक असलेल्या या पाच एकर जागेत संजय यांनी टिश्‍यू कल्चर पद्धतीने केळी लागवड करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2016 मध्ये तयारीला सुरुवात केली. स्थानिक तरुणांच्या मदतीने पाच एकर जागेत वाफे पाडून त्यावर प्लास्टिक मल्चिंग अंथरून ठेवले. पूर्ण पावसाळा त्यात रोपे न लावता नोव्हेंबरमध्ये जळगावहून चार हजार रोपे आणली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लागवड केली. या केळी लागवडीचे विशेष म्हणजे जी-9 जातीची ही रोपे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने लावली गेली आहेत. त्यांना वेळेवर आणि आवश्‍यक तेवढे पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन यंत्रणा बसवली आहे. मल्चिंग पद्धतीमुळे पाणीवापर कमी होत आहे. केळीसाठी भरपूर पाणी आवश्‍यक असल्याने त्याचे नियोजन तांत्रिक पद्धतीने केले जात आहे. जळगाव येथील जैन इरिगेशनचे अधिकारी आणि तंत्रज्ञ या बागेची पाहणी सातत्याने करतात. या बागेतील केळीच्या झाडाला किमान 30 किलोचा घड लागेल, असा त्यांचा अंदाज आहे. 

शेतीतून फायदा व्हावा म्हणून नाही; तर उच्चशिक्षित तरुणांनी व्यवसाय सांभाळून शेतीकडे वळावे, नवनवीन प्रयोग करावेत, या हेतूने आपण शेतीकडे वळलो आहोत, असे संजय यांनी सांगितले. 

पूर्णत: सेंद्रिय 
संजय हरपुडे यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता फक्त सेंद्रिय खत वापरूनच केळीचे पीक घेण्याचा प्रयत्न आहे. गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ व वडाच्या झाडाखालची माती असे मिश्रण तीन दिवस एकत्र करून तयार झालेले जीवामृत ठिबक सिंचनाद्वारे रोपांना दिले जात आहे. कोशाणे येथील प्रगतशील शेतकरी आप्पा ठोंबरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी होत आहे. पाच एकर लागवडीचा खर्च सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत जाईल. तीन वर्षांत 15 लाखांपर्यंत उत्पन्न निघू शकेल, असा विश्वास आहे. 

Web Title: organic farming