रत्नागिरीला ऑक्सिजन टॅंकर रायगडातून 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेला ऑक्‍सीजन टॅंकर वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर सोडून देण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (ता. 19) पुढे आला.

रत्नागिरी - जिल्ह्यात ऑक्‍सीजन टॅंकरचा रायगड येथून पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन सचिवांकडून मिळालेले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार चिपळूण येथील एका उद्योगासाठी आलेला ऑक्‍सीजन टॅंकर सोडून देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेला ऑक्‍सीजन टॅंकर वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर सोडून देण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (ता. 19) पुढे आला. याबाबत जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चिपळूणमधील इंडस्ट्रीसाठीचा ऑक्‍सीजन टॅंकर प्रशासनाने जप्त केला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो टॅंकर सोडा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या ऑक्‍सीजनची व्यवस्था केली जाईल असे आश्‍वासन दिले गेले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार तो सोडून देण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्याला दररोज सुमारे 15 किलोलीटर ऑक्‍सीजनची गरज लागते. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर नसुन ऑक्‍सीजनचाही तुटवडा जाणवत नाही. नुकताच खेड येथे एक ऑक्‍सीजन टॅंकर मिळाला आहे. सचिवांनीही रायगड येथून ऑक्‍सीजनची व्यवस्था जिल्ह्याला करुन दिली जाईल असे सांगितले आहे. 

जिल्ह्यात ऑक्‍टोबर अखेरपर्यंत कोरोना मोठ्याप्रमाणात पसरेल असा अंदाज आहे. तोपर्यंत नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करत आहे. कोल्हापूर येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. त्यांना दररोज 50 किलोलीटर ऑक्‍सीजनची गरज भासते. त्यामुळे कोल्हापूरमधून रत्नागिरी जिल्ह्याला ऑक्‍सीजन पुरवठा होणार नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था सचिवस्तरावरुन होत आहे. ऑक्‍सीजनचे नियंत्रण हे शासनाकडून होत असते, असे त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen Supply To Ratnagiri Form Raigad